Ranbir-Alia : प्राण्यांच्या अनाथालयात दोघांचा जीव जडला; अश्वांच्या जोडीला मिळाले 'आलिया-रणबीर'चे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 20:35 IST2022-04-15T20:34:27+5:302022-04-15T20:35:11+5:30
प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ॲनिमल राहत संस्थेने त्यांना आयुष्यभर स्मरणात राहील, अशी गोड भेट दिली आहे.

Ranbir-Alia : प्राण्यांच्या अनाथालयात दोघांचा जीव जडला; अश्वांच्या जोडीला मिळाले 'आलिया-रणबीर'चे नाव
सांगली : बॉलीवूडचे नवविवाहित हॉट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना लग्नसोहळ्यात असंख्य भेटवस्तू मिळाल्या असतील. त्यात काही नवलही नसावे. मात्र प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ॲनिमल राहत संस्थेने त्यांना आयुष्यभर स्मरणात राहील, अशी गोड भेट दिली आहे. संस्थेच्या प्राणी अनाथालयातील अश्वाच्या जोडीचे नामकरण रणबीर आणि आलिया असे केले आहे.
जखमी, बेवारस किंवा संकटग्रस्त प्राण्यांसाठी संस्थेचे बेळंकी (ता. मिरज) येथे अनाथालय आहे. तेथील अश्वांच्या जोडीचे शुक्रवारी नामकरण करण्यात आले. यातील घोडी विवाह समारंभात नाचण्यासाठी किंवा मिरवणुकीसाठी वापरली जायची, तर घोडा मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे व्हिक्टोरिया खेचण्यासाठी वापरला जायचा. व्यावसायिक मंदीमुळे घोडीला मालकाने बेवारस, जखमी अवस्थेत सोडून दिले होते, तर घोडा मुंबईतून जप्त करण्यात आला होता. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दोहोंवर अनाथालयात उपचार केले. आपुलकीने काळजी घेतली. सध्या दोघेही ठणठणीत आहेत. खेळण्या-बागडण्यासाठी विस्तीर्ण मैदान व सोबती आहेत. दोहोंनी परस्परांना जीव लावल्याचे कार्यकर्त्यांच्या ध्यानी आले. त्यावरुनच नामकरणाची संकल्पना सुचली.
अभिनेता रणबीर कपूरला प्राण्यांविषयक अतिव जिव्हाळा आहे. या दांपत्याने लग्नसोहळ्यात घोड्यांचा वापर टाळला. प्राण्यांवरील प्रेम दाखविण्यासाठी हा अतिशय योग्य प्रसंग होता. लग्नसोहळ्याच्या जल्लोषात संवेदनशील घोडे घाबरण्याची किंवा बुजण्याची शक्यता असते. रणबीरच्या निर्णयाने घोड्यांना संरक्षण मिळाले. त्याच्या प्राणीप्रेमाचे अनुकरण सर्वांनी करायला हवे. त्याच्या निर्णयाप्रती कृतज्ञता म्हणून अनाथालयातील जोडीचे नामकरण आलीया व रणबीर असे केले.
डॉ. नरेश उप्रेती,
मुख्य अधिकारी, ॲनिमल राहत, सांगली