दिवाळी पाडव्याला दोनशे कोटींची उलाढाल

By Admin | Published: November 13, 2015 11:09 PM2015-11-13T23:09:15+5:302015-11-13T23:44:28+5:30

नव्या तंत्रज्ञानाला ग्राहकांची पसंती : सोने-चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक, गृहोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी

Two hundred crore turnover of Diwali Padva | दिवाळी पाडव्याला दोनशे कोटींची उलाढाल

दिवाळी पाडव्याला दोनशे कोटींची उलाढाल

googlenewsNext

सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळी पाडव्याला शहरातील बाजारपेठ फुलून गेली होती. गुरुवारी बाजारपेठेत २०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. सोने-चांदी, दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक व गृहोपयोगी वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. नवीन फोर के तंत्रज्ञानाच्या एलईडी आणि फोर जी मोबाईलवर ग्राहकांच्या उड्या पडल्या, तर सोन्याचा दर दहा ग्रॅमला २६ हजाराच्या आसपास असल्याने, सराफकट्ट्यावरही गर्दी उसळली होती. परिणामी सोन्याची विक्रमी खरेदी झाली.
दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधून बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. वेगवेगळ्या आॅफर्स देण्यात आल्याने खरेदीला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या आॅफर्समध्ये लॅपटॉप, मोबाईल, टॅब यासह एलईडी टीव्ही, फ्रीजचा समावेश होता. वाहनांच्या खरेदीलाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
बाजारपेठेत ग्राहकांचा स्मार्ट फोन खरेदीकडे ओढा होता. आॅनलाईनच्या जमान्यातही दुकानात जाऊन मोबाईल खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिले. यंदा फोर जी तंत्रज्ञानासह मोठ्या रॅमच्या, ब्रॅन्डेड कंपन्यांच्या मोबाईलची खरेदी प्रामुख्याने झाली. आॅनलाईन मार्केटच्या आॅफर्सना टक्कर देण्यासाठी शहरातील मोबाईल विक्रेत्यांनीही ग्राहकांना चांगल्या आॅफर देऊ केल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत दुकाने ग्राहकांनी फुलून गेली होती. मोबाईलच्या दुकानातही ग्राहकांना खरेदीसाठी तास-तासभर थांबावे लागत होते.
दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात वाहन खरेदीची धूम दिसून आली. दसरा ते दिवाळीदरम्यान चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत २५ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले. चारचाकी वाहनांसाठी तर दिवाळीपूर्वीच बुकिंग झाले होते. पोरेज टीव्हीएसमध्ये ५१३ वाहनांची विक्री झाल्याचे संचालक अविनाश पोरे यांनी सांगितले. मोठ्या वाहनांच्या खरेदीवर पाच हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत सवलती देण्यात आल्या होत्या. मोफत विमा, मोफत सेवा अशा आॅफर दिल्याने, आॅटोमोबाईल क्षेत्रात उत्साह दिसून आला. एकूणच मंदीच्या काळात आलेल्या दिवाळी सणाने व्यापाऱ्यांना मोठा हात दिला आहे. बाजारपेठेत दोनशे कोटींची उलाढाल झाली आहे. (प्रतिनिधी)

सराफ बाजारात तोबा गर्दी
दिवाळी पाडव्याचा मुहूर्त आणि आवाक्यात असणाऱ्या सोन्याच्या दरामुळे सोने खरेदीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातच लग्नसराई अवघ्या पंधरवड्यावर आल्याने ती खरेदीही अनेकांनी पाडव्यादिवशीच करण्यास प्राधान्य दिले. दिवाळी पाडव्याला पतीकडून पत्नीला भेट दिली जात असल्याने, यावर्षी अनेकांचा सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे कल होता. यंदा सोन्याचा दर दहा ग्रॅमला २६ हजार असा आवाक्यात असल्यानेही गर्दी झाल्याचे सुवर्णकारांनी सांगितले. अनेक सुवर्ण पेढींवर ग्राहकांना चार ते पाच तास थांबावे लागत होते. सराफ बाजारातील दुकानात रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.

फोर जी मोबार्ईलला मागणी
आजकाल केवळ स्मार्ट फोन घेऊन चालत नाही, तर त्यातील फिचरही आजच्या जमान्यातील असावेत, या हेतूने ग्राहकांनी फोर जी तंत्रज्ञानाच्या मोबाईलला पसंती दिली. जादा मेगा पिक्सलचा कॅमेरा आणि ब्रॅन्डेड कंपनीच्या मोबाईलला जास्त मागणी होती. आॅनलाईन मार्केटच्या जाळ्याने बाजारपेठ व्यापली असतानाही, ग्राहकांनी प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले.

मोबाईल खरेदीला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व विक्रेत्यांची तडाखेबंद विक्री झाली. मोबाईलमध्ये ब्रॅन्डेड कंपन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा होता. अनेक ग्राहकांनी आॅनलाईनऐवजी दुकानातून मोबाईल खरेदीला पसंती दिली होती. यंदाच्या दिवाळीत मोबाईलची मोठी विक्री झाल्याने, विक्रेत्यांत समाधान आहे.
- आदित्य मेहता, मेहता टेलिकॉम


लग्नसराई जवळ आल्याने ग्राहकांनी दिवाळी पाडव्यास सोने खरेदीला प्रतिसाद दिला. गेल्या काही दिवसांपासून सोने दर स्थिर असल्यानेही ग्राहकांचा ओढा वाढल्याची शक्यता आहे. दागिन्यांना चांगली मागणी होती. सोन्याचे दर आणि येत्या पंधरवड्यापासून सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे मोठी उलाढाल झाली.
- किशोर पंडित, संचालक, अनंत गणेश पंडित सराफ, सांगली

वाहनांची विक्री वाढली
दसऱ्याला दुचाकी व चारचाकी वाहनांची दोन हजाराच्या आसपास विक्री झाली होती. दिवाळीला पुन्हा एकदा ग्राहकांचा वाहन खरेदीस प्रतिसाद मिळाला. अडीच हजारावर दुचाकी वाहनांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. चारचाकी वाहनांचीही चांगली विक्री झाली. यंदा दोनशेवर ट्रॅक्टरचीही विक्री झाली. ५१३ टीव्हीएस वाहनांची विक्री झाली, तर हिरोच्या वाहनांची अठराशेवर विक्री झाली. वाहनांमध्ये स्कूटरेट प्रकारच्या वाहनांना अधिक मागणी होती.

Web Title: Two hundred crore turnover of Diwali Padva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.