सांगलीत दोनशे रूपयाच्या बनावट नोटा, अनेक भाजीविक्रेत्यांना अज्ञाताचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:00 PM2019-01-17T13:00:13+5:302019-01-17T13:01:53+5:30
सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला. रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आला. त्यांनी जाणकारांना दाखविल्यानंतर त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशा बनावट नोटा खपविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
संजयनगर : सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला. रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आला. त्यांनी जाणकारांना दाखविल्यानंतर त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशा बनावट नोटा खपविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
संजयनगर येथे आठवड्याचा बाजार बुधवारी भरत असतो. नेहमीप्रमाणे बुधवारी बाजार भरला होता. रात्री ९ च्या सुमारास एक अनोळखी ग्राहक आला आणि त्याने येथील बाजारात भाजी विक्रेत्या शालन शेळके यांच्याकडून अर्धा किलोची वांगी घेतली व त्यांना दोनशे रूपयाची बनावट नोट दिली. त्यांच ग्राहकांने सोनाबाई कोळपे यांच्यासह सुमारे आठ विक्रेत्यांना अशाचप्रकारे बनावट नोटा दिल्या.
बाजारात ग्राहकांची गर्दी असल्याने विके्रत्यांनी घाईगडबडीत नोटा तशाच स्वीकारल्या. रात्री उशीरा बाजार संपल्यावर हिशेब करताना भाजी विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या नोटेबद्दल शंका वाटली. काही जाणकार लोकांना दाखविल्यानंतर नोटा बनावट असल्याचे दिसून आले. या नोटांमधील हिरवा व निळ््या रंगात बदलणारा सुरक्षा धागा अस्तित्वात नव्हता. दोनशे रुपयांच्या आकड्यामागे चक्र दिसत नव्हते.
हुबेहुब दिसणाऱ्या या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई झाल्याचीही शक्यता आहे. यामागे एखादी मोठी टोळी असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वी अनेकदा बनावट नोटांच्या घटना उजेडात आल्या आहेत. विविध पोलिस ठाण्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळींविरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे या टोळीचा छडा लावून सामान्य लोकांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
सुरक्षेचा प्रश्न गंभीर
संजयनगर येथील आठवडा बाजारात पाकीट मारणे , महिलांची छेड छाड करणे असे प्रकारही घडत आहेत. आता बनावट नोटांचाही प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सर्वच दृष्टीने येथील बाजार असुरक्षित बनला आहे. त्यामुळे या बाजारात पोलीस बंदोबंस्त ठेवावा, अशी मागणी काही विक्रेत्यांनी केली.