सांगलीत आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:23 AM2021-04-14T04:23:45+5:302021-04-14T04:23:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बसस्थानक परिसरातील लाॅजवर छापा टाकून आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बसस्थानक परिसरातील लाॅजवर छापा टाकून आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक केली. हे दोघे राजस्थान राॅयल्स व पंजाब किंग्ज इलेव्हन या सामन्यांवर सट्टा घेत होते. त्यांच्याकडून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चेतन माणिकराव गुजर (वय ३०, केदार अपार्टमेंट शाहू उद्यानजवळ, सांगली) व इम्रान अस्लम दानवडे (२६, नुराणी मशिदीजवळ, कत्तलखाना, सांगली) असे अटक केलेल्या सट्टेबाजांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना दिले होते. त्यानुसार, सट्टेबाजांवरील कारवाईसाठी खास पथक तयार करण्यात आले. सोमवारी हे पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करीत असताना, बसस्थानक परिसरातील सुखरूप लाॅजवर एक जण राजस्थान राॅयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. पथकाने लाॅजवर छापा मारला. यावेळी खोली क्रमांक २०१ मध्ये चेतन गुजर व इम्रान दानवडे क्रिकेटचा सामना पाहत होते, तसेच ते मोबाईलवर बोलत वहीत लिहून घेत असल्याचे आढळून आले. एलसीबीच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. पथकाने दोघांकडून चार मोबाईल, बाॅलपेन, हिशेबाच्या वहीसह ५८ हजार ८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांनी पंचनामा करून, या दोघांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर मुंबई जुगार अधिनियम १८८७ चे कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.