भोसेजवळ अपघातात दोन ठार, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:47 AM2017-11-02T00:47:04+5:302017-11-02T00:49:16+5:30

Two killed and three injured in an accident near Bhos | भोसेजवळ अपघातात दोन ठार, तिघे जखमी

भोसेजवळ अपघातात दोन ठार, तिघे जखमी

googlenewsNext

मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर भोसेजवळ कंटेनरने पिकअप् टेम्पोला ठोकरल्याने दोघेजण ठार झाले, तर तिघेजण जखमी झाले. जखमी व मृत बार्शी तालुक्यातील असून, कोल्हापूर येथे सीताफळ विक्री करुन ते परत जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. हा अपघात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला.
पंढरपूर रस्त्यावर भोसे हद्दीत पंढरपूरच्या दिशेने जाणाºया पिकअप् टेम्पोला (एमएच २५, पी ५८१७) समोरून मिरजेच्या दिशेने भरधाव येणाºया कंटेनरने (एचआर ५५, एपी २९०४) ठोकरले. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे टेम्पोच्या हौद्यात बसलेल्या पाचजणांपैकी दोघांचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. नबी मौला शेख (वय ४७, रा. पांगरी, ता. बार्शी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी अवस्थेतील खंडू चंद्रकांत चांदणे (३०, रा पांगरी, ता. बार्शी) यांचा मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. तसेच दस्तगीर याकूब शेख (२५, रा. पांगरी) व राजू चांद शेख (४०, रा. पांगरी) या दोन जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत, मनोहर शिंदे (रा. बार्शी) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे पिक-अप् टेम्पो रस्त्याकडेला उलटून टेम्पोचा हौदा तुटून रस्त्याकडेच्या झाडीत अडकला होता. टेम्पोचालक मेहबूब शेख (रा.पांगरी), संभाजी ऊर्फ आप्पासाहेब तुळशीदास शिंदे (रा. चिंचोली) व समीर बशीर पठाण (रा. उस्मानाबाद) हे चालकासोबत पुढे बसलेले तिघेजण सुदैवाने बचावले.
अपघातानंतर पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. क्रेनच्या साहाय्याने टेम्पो व कंटेनर हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. कंटेनर चालकाने अपघातानंतर पलायन केले. अपघाताबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात समीर पठाण याने फिर्याद दिली असून, फरारी कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीच्या पोलिस अधीक्षकांचे भाऊ बचावले
अपघातातील मृत व जखमी बार्शी तालुक्यातील शेतकरी व फळे वाहतूक करणारे आहेत. पांगरी पांढरी व चिंचोली येथील हे सर्वजण मेहबूब शेख यांच्या टेम्पोतून कोल्हापुरात सीताफळे विक्रीसाठी आले होते. सकाळी शाहू मार्केट यार्डात सीताफळे विक्री करुन ते गावी परत जात होते. सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे भाऊ संभाजी ऊर्फ आप्पासाहेब शिंदे हे सुध्दा त्यांच्या शेतातील सीताफळे विक्रीसाठी या टेम्पोतून आले होते. संभाजी शिंदे या अपघातात सुदैवाने बचावले.
टेम्पोचा चक्काचूर
अपघातात मृत नबी शेख यांच्यासोबत आलेला त्यांचा भाचा समीर पठाण हा वाचला. समोरुन भरधाव वेगाने येणाºया कंटेनरला चुकविण्यासाठी टेम्पो रस्त्याकडेला घेतल्यानंतरही, टेम्पोच्या हौद्याला कंटेनरने ठोकरल्याने टेम्पो उलटून टेम्पोचा चक्काचूर झाला.

Web Title: Two killed and three injured in an accident near Bhos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात