तासगाव तालुक्यात वीज कोसळून दोन ठार
By admin | Published: May 12, 2017 07:26 PM2017-05-12T19:26:13+5:302017-05-12T19:26:13+5:30
वडगाव (ता. तासगाव) येथे शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून दोन शेतमजूर जागीच ठार झाले. शंकर कोंडी पाटील (वय ६०) आणि अरविंद राजाराम बिसले (४५) अशी त्यांची नावे आहेत.
तासगाव : वडगाव (ता. तासगाव) येथे शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून दोन शेतमजूर जागीच ठार झाले. शंकर कोंडी पाटील (वय ६०) आणि अरविंद राजाराम बिसले (४५) अशी त्यांची नावे आहेत.
शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तासगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वडगाव येथे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी ओढ्यालगत झाडे तोडण्याचे काम सुरू होते. गावातील पाच शेतमजूर या कामावर होते. वादळी वारा आणि विजांचा कडकडाट सुरु झाल्यानंतर तीन मजूर झाडापासून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी बाजूला गेले, तर शंकर पाटील आणि अरविंद बिसले झाडापासून बाजूला जात असतानाच वीज कोसळली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच वडगावसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिस पाटलांनी पोलिसांना दिली. त्यानंतर रात्री उशिरा तासगाव पोलिसांत नोंद करण्यात आली.
दैव बलवत्तर म्हणून तिघे बचावले
झाडाचे तोडकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाच शेतमजूर होते. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर यातील तिघे शेतमजूर तातडीने झाडापासून काही अंतरावर बाजूला गेले. इतक्यात झाडावर वीज कोसळली आणि झाडाखाली असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून इतर तीन मजुरांचा प्राण बचावल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.
घरची परिस्थिती हलाकीची
वीज कोसळून ठार झालेल्या दोघाही मजुरांच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे. शंकर पाटील यांच्या पश्चात पत्नी असून त्यांना मुले नाहीत. अरविंद बिसले यांच्याही घरची परिस्थिती बेताची असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि शिक्षण घेणारी दोन मुले आहेत. या घटनेनंतर वडगावात हळहळ व्यक्त होत होती