जत तालुक्यात दोन अपघातांत दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:19 AM2021-01-10T04:19:25+5:302021-01-10T04:19:25+5:30
जत : जत तालुक्यातील विजापूर - गुहागर राज्यमार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण ...
जत : जत तालुक्यातील विजापूर - गुहागर राज्यमार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जत शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कुंभारवाडी (कुंभारी. ता. जत) येथील पूनम राहुल चव्हाण (वय २३) या भाऊ पवनकुमार आनंदा शिंदे यांच्यासोबत दुचाकीवरून कुंभारी गावात रुग्णालयात गेल्या होत्या. येथून परत घरी येत असताना विजापूर ते गुहागर राज्यमार्गावर समोरून येणाऱ्या मोटारीने (क्र. एम. एच. १०. सी. ए. ८२७५) दुचाकीस जोरदार धडक दिली. यात पूनम चव्हाण या रस्त्यावर पडल्याने डोक्यास मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी पवनकुमार शिंदे याच्यावर जतमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना कुंभारी ते कुंभारवाडी रस्त्यावर कुंभारीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर घडली आहे.
दुसऱ्या घटनेत, जत - मुचंडीदरम्यान जतपासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर लायाप्पा सिद्राया पुजारी (वय ५२ ) व बसाप्पा नंद्याप्पा बेन्नूर (४५ दोघे रा. सिद्धनाथ ता. जत) हे दोघे दुचाकीवरुन (क्र. एम. एच. १०. बी. बी. ५६९९) जतहून सिद्धनाथ येथे जात होते. यावेळी समोरून येणारा ट्रेलरने (क्र. एम. एच. ४६. बी. एम. ७१७७) त्यांना जोरदार धडक दिली. यात लायाप्पा पुजारी यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी बसाप्पा बेन्नूर यांच्यावर जतमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची शनिवारी रात्री उशिरा जत पोलिसांत नोंद झाली आहे.
चौकट
हेल्मेट असते तर...
दोन्ही अपघातांत मोटारसायकलस्वार व त्यांच्या पाठीमागे बसलेल्या नागरिकांनी डोक्याला हेल्मेट घातले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.