अलमट्टीतून पावणेदोन लाख क्युसेकने विसर्ग सुरू; वारणा, कोयनेतूनही विसर्ग वाढविला
By अशोक डोंबाळे | Published: July 27, 2023 05:06 PM2023-07-27T17:06:04+5:302023-07-27T17:07:49+5:30
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे
सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्यामुळे अलमट्टी धरणात ८१.१४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ६६ टक्के भरले आहे. धरणात एक लाख ६१ हजार ७४७ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणातून गुरुवारी दुपारी चारपासून एक लाख ७५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली. सांगली जिल्ह्यासह वारणा, कोयना धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे तेथून विसर्ग वाढविला आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे. वारणा (चांदोली) धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. वारणा धरण क्षेत्रात चोवीस तासांत ५५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दिवसभरही संततधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणात सध्या २९.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ८४ टक्के भरल्यामुळे धरणातून विद्युतगृह आणि गेटमधून तीन हजार १७५ क्युसेकने विसर्ग चालू आहे.
कोयना धरण क्षेत्रातही ११९ मिलीमीटर पाऊस झाला असून, धरणात सध्या ६४.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ६१.११ टक्के भरले आहे. धरणाच्या विद्युतगृहातून एक हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू असल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढत आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वारणा धरणावरील आठ पूल पाण्याखालीच आहेत.
मिरज तालुक्यात सर्वाधिक ३१.५ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) : मिरज ३१.४५ (१७४.४), जत १९.७ (१३८.४), खानापूर १५.१ (१०५.१), वाळवा १२.९ (१९२.५), तासगाव २१.५ (१७७.५), शिराळा २१.७ (४८९.२९), आटपाडी ७.५ (१०८.३), कवठेमहांकाळ २२.४ (१४९.१), पलूस २१.१ (१६२.४), कडेगाव ११ (१२५.९).