अलमट्टीतून दोन लाख क्युसेकने विसर्ग, सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप; कृष्णेची पातळी २५ फुटांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 11:31 AM2022-08-11T11:31:42+5:302022-08-11T11:32:07+5:30
वारणा धरणातून ९४४८ क्युसेकने विसर्ग सुरू झाल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले
सांगली : जिल्ह्यात काल, बुधवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती; पण शिराळा तालुक्यासह वारणा (चांदोली) धरण परिसरात मात्र पाऊस सुरू आहे. यामुळे वारणा धरणातून ९४४८ क्युसेकने विसर्ग सुरू झाल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असून बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा नदीची दिवसात पाच फुटाने पाणीपातळी वाढून २५ फुटांवर गेली आहे. नागठाणे, कसबे डिग्रज बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
शिराळा, वाळवा तालुक्यांत किरकोळ पाऊस झाला आहे. उर्वरित तालुक्यात बुधवारी पावसाने उघडीप दिली होती. वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात मात्र अतिवृष्टी सुरूच आहे. बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासात १३८ मिलिमीटर तर दिवसभरात २० मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणातं ३१.०५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ९१ टक्के भरले आहे. यामुळे ९४४८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून सात पूल पाण्याखाली गेले आहेत.
कोयना धरण क्षेत्रातही अतिवृष्टी सुरूच आहे. कोयना धरणात ८०.४५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ७६ टक्के भरले आहे. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
अलमट्टीतून दोन लाख क्युसेकने विसर्ग
अलमट्टी धरणामध्ये १२३ टीएमसी पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. मंगळवारी धरणात ११७.५४ टीएमसी पाणीसाठा होता. धरणात एक लाख दोन हजार १८६ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. यामुळे बुधवारी सायंकाळी पाचनंतर दोन लाख क्युसेकने विसर्ग सुरू करून दोन टीएमसीने पाणीसाठा कमी करून सध्या ११५.५४ टीएमसी ठेवला आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढविण्याची अलमट्टी जलसंपदा प्रशासनाने तयारी ठेवली आहे.
धरणातील पाणीसाठा
धरण क्षमता सध्याचा पाणीसाठी टक्केवारी
अलमट्टी १२३ ११५.५४ ९३.८८
कोयना १०५.२३ ८०.४५ ७६
वारणा ३४.२० ३१.०५ ९१