एरंडोलीत बोगस पावत्यांद्वारे दोन लाखांची घरपट्टी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:43 PM2021-06-01T16:43:08+5:302021-06-01T16:44:28+5:30
Crime Sangli : एरंडोली (ता. मिरज) ग्रामपंचायतीत बोगस पावत्यांद्वारे दोन लाखांहून अधिक रकमेची घरपट्टी गोळा करण्यात आली. या पैशांचा एका शिपायाने अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
सांगली : एरंडोली (ता. मिरज) ग्रामपंचायतीत बोगस पावत्यांद्वारे दोन लाखांहून अधिक रकमेची घरपट्टी गोळा करण्यात आली. या पैशांचा एका शिपायाने अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडे नोंद नसलेल्या पावती पुस्तकांचा वापर शिपायाने केल्याची माहिती सरपंच वासंती धेंडे यांनी दिली. याद्वारे वसुल केलेली रक्कम सुमारे दोन लाखांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. वसुली अपेक्षेहून कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर धेंडे यांनी सतत दोन महिने लक्ष ठेवले.
काही मालमत्ताधारकांशी चर्चा केली. त्यांनी घरपट्टी भरल्याचे सांगत पावत्याही दाखवल्या. धेंडे यांनी ग्रामपंचायतीत पडताळणी केली असता संबंधित मालमत्ताधारकांच्या नावे थकबाकी कायम असल्याचे दिसले, शिवाय त्यांनी दाखवलेल्या पावत्या ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसल्याचेही आढळले.
चौकशीअंती शिपायाकडे नोंद नसलेली पावती पुस्तके सापडली. ती कोठून मिळवली याचा माग काढला जात आहे. नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या काळात वसुलीसाठी पुस्तके वापरली गेली आहेत. त्यावर त्याच्या सह्यादेखील आहेत.
वसुल घरपट्टीचा भरणा ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात केलेला नाही. यामुळे सरपंचांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली. डुडी यांच्या सुचनेनुसार मिरज पंचायत समितीचे विस्ताराधिकारी सदाशिव मगदुम अधिक चौकशी करत आहेत. डुडी म्हमाले की, अनधिकृत पावत्यांद्वारे घरपट्टी वसुली ही गंभीर बाब आहे. याची सखोल चौकशी करु. संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. सरपंच धेंडे म्हणाल्या, ग्रामपंचायतीच्या पैशांचा अपहार धक्कादायक आहे. यापूर्वीच्या वसुलीच्या ऑडिटचीही मागणी करणार आहोत.