सांगलीत तीन ठिकाणी दोन लाखांचा मुद्देमाल चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:57+5:302021-06-09T04:32:57+5:30
सांगली : शहरातील भोसले प्लॉट (शामरावनगर) आणि आकाशवाणी परिसरातील दोन बंगले व एक बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान चाेरट्यांनी फोडले. ...
सांगली : शहरातील भोसले प्लॉट (शामरावनगर) आणि आकाशवाणी परिसरातील दोन बंगले व एक बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान चाेरट्यांनी फोडले. यात रोख एक लाख रुपयांसह अडीच तोळे सोन्याची दागिने, डीव्हीआर मशीन, टीव्ही, प्रापंचिक साहित्यासह ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला.
याप्रकरणी संजय देवाप्पा कुपाडे (रा. गणेश पार्क, कोल्हापूर रोड,सांगली), श्रीधर रावसाहेब कोळी (रा. आकाशवाणीच्या पाठीमागे, सांगली) आणि अफजलखान महमदहनिफ पठाण (रा. शामरावनगर, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला. कोल्हापूर रोडवर अमित संजय कोरे यांचे कोरे सेल्स काॅर्पोरेशन नावाचे दुकान असून चोरट्यांनी या ठिकाणाहून डीव्हीआर मशीन व रोख ९२० रुपये लंपास केले. या दुकानातील कर्मचारी संजय कुपाडे यांनी फिर्याद दिली आहे.
आकाशवाणीच्या पाठीमागे राहण्यास असलेल्या पोलीस कर्मचारी दीपाली कोळी राहण्यास आहेत. त्या कुटुंबासह गावी गेल्या होत्या. या कालावधीत चोरट्यांनी घरात प्रवेश करत टीव्ही व घरातील इतर साहित्य लांबविले.
तिसऱ्या घटनेत शामरावनगर रोडवरील भोसले प्लॉट येेथील जय गणेश कॉलनीत राहण्यास असलेल्या पठाण यांच्या घरातील तिजोरी व कपाट फोडून रोख रकमेसह सोन्याची दागिने असा ऐवज लंपास केला.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.