सांगलीत पावणे दोन लाखांचा सुगंधी तंबाखूचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:28 AM2021-02-11T04:28:59+5:302021-02-11T04:28:59+5:30
सांगली : विक्रीस बंदी असतानाही सुगंधित तंबाखू, सुपारी व गुटख्याचा साठा करून ठेवणाऱ्या सांगलीतील चारजणांवर अन्न व औषध प्रशासन ...
सांगली : विक्रीस बंदी असतानाही सुगंधित तंबाखू, सुपारी व गुटख्याचा साठा करून ठेवणाऱ्या सांगलीतील चारजणांवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख ७५ हजार ४०० रुपये किमतीचा पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी, गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सुकुमार चौगुले यांनी दिली.
बंदी असतानाही सुगंधीत तंबाखू, गुटख्याचा साठा करून विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार विश्रामबाग येथील संभाजी तायाप्पा पाटील यांच्या संभाजी पान शॉप,येथे पानमसाला, सुगंधित तंबाखू असा १० हजार ३२३ रुपयांचा साठा, विठ्ठल तायाप्पा पाटील यांच्या मंजुषा पानशॉपमध्ये ५१५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
याशिवाय मोहसीन आयूब शेख यांच्या पुष्पक पानशॉपमध्ये १ हजार २५० रुपये किमतीचा आणि गणपती पेठ येथील बिरमा करमचंद गिडवानी यांच्या गोडावूनमध्ये असणारा १ लाख ६३ हजार ३१२ रूपयांचा असा एकूण १ लाख ७५ हजार ४०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या सर्वांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी कारवाई केलेल्या सत्यम पानशॉपमधील संशयितांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचेही चौगुले यांनी सांगितले.
चौकट
सुगंधित तंबाखू, गुटख्याच्या साठवणुकीवर व विक्रीवरही बंदी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यावसायिकाने बंदी असलेल्या पदार्थाचा साठा करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक आयुक्त चौगुले यांनी दिला.