बेशिस्त लोकांना आठवड्यात दोन लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:39 AM2021-02-26T04:39:43+5:302021-02-26T04:39:43+5:30
सांगली : कोरोनाच्या नियमांना ठेंगा दाखवून बेशिस्तपणाचे दर्शन घडविणाऱ्या लोकांकडून महापालिकेने आठवडाभरात दोन लाखांचा दंड वसूल केला आहे. अजूनही ...
सांगली : कोरोनाच्या नियमांना ठेंगा दाखवून बेशिस्तपणाचे दर्शन घडविणाऱ्या लोकांकडून महापालिकेने आठवडाभरात दोन लाखांचा दंड वसूल केला आहे. अजूनही मोहीम सुरूच असून महापालिका आयुक्तांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे आणि स्मृती पाटील यांच्यासह आरोग्य आणि अग्निशामक टीमने ही संयुक्त कारवाई केली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. यामध्ये विनामास्क फिरणारे, रस्त्यावर थुंकणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे अशा लोकांवर कारवाई केली जात आहे.
आयुक्त कापडणीस यांनी कारवाईचे आदेश दिल्यापासून आठ दिवसांत महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगलीत, तर उपायुक्त स्मृती पाटील यांनी कुपवाड-मिरजेमध्ये कारवाईला वेग आणला आहे. यामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांत कारवाई सुरू असून मागील आठ दिवसांत महापालिकेच्या पथकाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३७ व्यक्तींकडून एक लाख ९८ हजारांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये विनामास्क ५००, सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याबद्दल आठ लोकांवर, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक सहभागी झाले आहेत. ही कारवाई दररोज सुरू राहणार असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.