दोन लाखांचा गांजा डोर्लीजवळ जप्त
By admin | Published: September 22, 2016 12:49 AM2016-09-22T00:49:26+5:302016-09-22T00:49:26+5:30
दोघे ताब्यात : कारवाई संशयाच्या भोवऱ्यात
जत : डोर्ली ते हिवरे (ता. जत) रस्त्यावरील डोर्ली परिसरातील दोन शेतकऱ्यांच्या शेतावर जत पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकून दोन लाख रुपयांची तयार गांजाची झाडे जप्त केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली. परंतु बुधवारी रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
जत ते डोर्ली रस्त्यावरील डोर्ली परिसरातील दोन शेतकऱ्यांनी हळदीच्या पिकात गांजाची झाडे लावली आहेत. याची माहिती खबऱ्यांकडून जत पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांमार्फत छापा टाकून सुमारे सात-आठ फूट उंचीची तयार गांजाची झाडे जप्त केली. त्याची किंमत दोन लाख रुपये इतकी आहे. त्यानंतर पंचनामा करून मुद्देमाल व संशयितांना ताब्यात घेण्यात आले. परंतु बुधवारी रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे गांजाची किती झाडे आहेत व त्यांची नेमकी किंमत व वजन काय आहे, याचा तपशील समजू शकला नाही. जत पोलिस ठाण्याशी यासंदर्भात बुधवारी सायंकाळी संपर्क साधला असता, अशी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जत तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात सहा महिन्यांपूर्वी गांजाच्या शेतीबाबत कारवाई करण्यात आली होती. परंतु गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची जत येथून बदली करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. (वार्ताहर)