दोन लाखांचा औषधसाठा जप्त
By admin | Published: July 22, 2014 11:10 PM2014-07-22T23:10:03+5:302014-07-22T23:14:47+5:30
जीवनदायी योजना : अन्न व औषध प्रशासनाने केली कारवाई, औषधे बंद झाल्याने रुग्णांचे हाल
सांगली : राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णांना देण्यात येणाऱ्या मोफत औषधांचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने आज (मंगळवार) येथील शासकीय रुग्णालयातील दोन लाखांची औषधे जप्त करून ती सील केली. दरम्यान, कालपासून या योजनेतील लाभार्थी रुग्णांंना ही औषधे देणे बंद झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णांंना मोफत उपचार व औषधांचा पुरवठा केला जातो. मात्र या औषधांसाठी शासकीय रुग्णालयात पैसे घेत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. योजनेच्या औषधांचा बेकायदा साठा सांगली व मिरजेच्या शासकीय रुग्णालयात केल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारपासून अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकण्यास सुरुवात केली. सोमवारी मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून ५ लाख ८६ हजारांची औषधे जप्त करून ती सील करण्यात आली. त्यानंतर कालपासून सांगलीतील शासकीय रुग्णालयातील औषध साठ्याची तपासणी सुरू होती. आज सायंकाळपर्यंत सुमारे दोन लाखांची औषधे जप्त केल्याची माहिती अन्न निरीक्षक जयश्री सौंदत्ते यांनी दिली.
सौंदत्ते यांनी सांगितले की, योजनेतील औषधांचा साठा करता येत नाही. करायचा असल्यास त्याची अन्न व औषध प्रशासनाकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. या औषधांचा साठा करून त्यांची विक्री केल्याचा संशय आहे. बेकायदा साठा सापडला असून, यातील औषधांची विक्री झाली आहे का, याची तपासणीही सुरू आहे. औषधे विक्री झाल्याच्या अद्याप तक्रारी नाहीत. जप्त आणि सील केलेल्या औषधांचा अहवाल आम्ही सहाय्यक आयुक्तांना देणार आहोत.
दरम्यान, कालपासून या योजनेतील रुग्णांना औषधे देण्याचे बंद झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. सांगली व मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील कर्करोग, भाजलेल्या, डायलेसीसवरील गरीब रुग्णांंना औषधे मिळणे बंद झाल्याने ती आता विकत घेण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)