शिरटेत कोरोना मृताच्या कुटुंबाला मित्रांची दोन लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:44+5:302021-06-04T04:21:44+5:30
फोटो लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शिरटे (ता. वाळवा) येथील युवक राष्ट्रवादीचे सदस्य विशाल उर्फ शंभूराजे विलास पवार यांचे ...
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शिरटे (ता. वाळवा) येथील युवक राष्ट्रवादीचे सदस्य विशाल उर्फ शंभूराजे विलास पवार यांचे वयाच्या ३२ व्या वर्षी कोरोना संसर्गाने निधन झाले. मित्र परिवाराने त्यांच्या लहान मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलत दोन लाखांची मदत देऊन मित्रत्वाच्या जाणिवेसह दातृत्वही जपले.
मित्र परिवारात शंभूराजे नावाने परिचित असणारा विशाल हरहुन्नरी स्वभावाचा होता. मित्रांच्या हाकेला आणि प्रत्येक अडचणीला, सुख-दुःखात नेहमी पुढे असायचा. पाच वर्षांपूर्वी त्याचा भाऊ अपघाती घटनेत सोडून गेला. तेव्हापासून कुटुंबाची जबाबदारी शंभूराजे बघत होता. त्याला चार वर्षांचा मुलगा आणि चार महिन्यांची मुलगी आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गाने त्याचा बळी घेतला. घरातला कर्ता-सवरता मुलगा गेल्याने सर्व कुटुंबीय दुःखात असताना त्याच्या मित्र परिवाराने एकत्र येत शंभूच्या कुटुंबाला आधार आणि धैर्य देण्याचा निर्णय घेतला. हे सगळेच मित्र शेतकरी कुटुंबातील असून, प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. सर्वांनी शंभूच्या दोन्ही लहान मुलांच्या भविष्याचा विचार करत त्यांच्या शिक्षणासाठी कुवतीप्रमाणे वाटा उचलत दोन लाख रुपयांचा निधी जमा केला.
काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते विमा पॉलिसीच्या माध्यमातून दोन्ही मुलांच्या नावे ठेवलेले दोन लाख रुपयांचे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) शंभूच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले. यावेळी माजी नगरसेवक शिवाजी पवार, विजय काइंगडे, विनायक जाधव, मिलिंद जाधव, संदीप पाटील, उमेश रासनकर, संतोष पाटील, प्रमोद माळी, बाबुराव जाधव आणि संदेश देसाई उपस्थित होते.