सांगलीत दोन घरफोड्यात रोख रक्कमेसह सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:45 AM2017-10-26T11:45:54+5:302017-10-26T11:52:13+5:30
सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाली असून अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही ठिकाणाहून ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली , दि. २६ : सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाली असून अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही ठिकाणाहून ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धामणी रस्त्यावरील पार्श्वनाथ कॉलनीत जिवंधर धनपाल भोरे (वय ५८) यांचा धनलक्ष्मी नावाचा बंगला आहे. भोरे हे कुटुंबासह सोमवारी देवदर्शनासाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या बंद बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने बंगल्यात प्रवेश केला.
बेडरूमच्या दरवाजाचे लॉक तोडून, कपाटातील सोन्याची चेन, मंगळसूत्र, अंगठी व रोख २३ हजार रुपये असा ७३ हजार रुपयांचा माल लंपास केला. बुधवारी भोरे कुटुंबीय सांगलीत परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस फौजदार पाटील करीत आहेत. चोरीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, चोरीची दुसरी घटना हिराबाग कॉर्नर येथील मोरेश्वर बेकरीत घडली आहे. बेकरीचा माल चोरीस गेल्याची फिर्याद आनंदा चिकोडे यांनी शहर पोलिसांत दिली आहे.
मंगळवारी रात्री चोरट्याने बेकरीची कुलपे तोडून दरवाजा उचकटून आत प्रवेश केला व टेबलच्या ड्रॉव्हरमधील साडेनऊ हजार रुपयांची रोकड लंपास केली. जाताना बेकरीतील खाद्यपदार्थही विस्कटले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद नव्हती.