सांगली-मिरजेच्या दोन सावकारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:12+5:302021-07-15T04:20:12+5:30
कुपवाड : व्याज व मुद्दलावरून महिलेला दमदाटी करून दुचाकी ओढून नेणाऱ्या दोन सावकारांना कुपवाड पोलिसांनी अटक केली. प्रशांत सोमलिंग ...
कुपवाड : व्याज व मुद्दलावरून महिलेला दमदाटी करून दुचाकी ओढून नेणाऱ्या दोन सावकारांना कुपवाड पोलिसांनी अटक केली. प्रशांत सोमलिंग कांबळे (वय ३२, रा. पत्रकारनगर, बाबर गल्ली, सांगली) व रेश्मा जहांगीर नदाफ (२५, रा. शंभर फुटी रोड, खाॅजा काॅलनी, मिरज) अशी त्यांची नावे असून, याप्रकरणी कुपवाड शहरातील सुजाता विजय कोलप यांनी फिर्याद दिली आहे. न्यायालयाने दोन्ही सावकारांना दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
सुजाता कोलप यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये प्रशांत कांबळे या सावकाराकडून एक लाख रुपयांचे कर्ज मासिक २० टक्के व्याजाने घेतले होते. कोलप यांनी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यांचे प्रत्येकी २० हजार रुपयांप्रमाणे ६० हजार रुपये व्याज दिले होते. त्यानंतर व्याजाची रक्कम थकल्याने संशयित कांबळे याने कोलप यांची दुचाकी (क्र. एमएच ११ सीओ २९११) व्याजापोटी काढून घेतली होती.
कोलप यांनी मिरजेतील रेश्मा नदाफकडूनही जानेवारी २०२१ मध्ये ५० हजार रुपये मासिक २० टक्के व्याजाने घेतले होते. नदाफने कर्जापोटी कोलप यांची दुसरी दुचाकी (क्र. एमएच १० डीडी ७३३२) तारण म्हणून घेतली होती. मात्र तिनेही व्याज व मुद्दलावरून दमदाटी सुरू केली होती. कोलप यांनी याबाबतची तक्रार कुपवाड पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करून दोन्ही दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी दिली.