Sangli: रिलायन्स दरोड्यातील आणखी दोघांना अटक, डेहराडूनमधून घेतला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:46 AM2024-02-26T11:46:39+5:302024-02-26T11:46:53+5:30

आतापर्यंत पाच जणांना अटक

Two more arrested in Reliance robbery Sangli, taken into custody from Dehradun | Sangli: रिलायन्स दरोड्यातील आणखी दोघांना अटक, डेहराडूनमधून घेतला ताबा

Sangli: रिलायन्स दरोड्यातील आणखी दोघांना अटक, डेहराडूनमधून घेतला ताबा

सांगली : येथील रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणात सहभागी असलेल्या एसपी ऊर्फ अनिल सोनी (रा. जिंदाल सॉ लिमिटेड, मुंद्रा, गुजरात) व शशांक ऊर्फ सोनू धनंजयकुमार सिंग (रा. सोनपुरा, जि. सदरसा, बिहार) या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी डेहराडून येथील कारागृहातून ताब्यात घेतले. दोघांची पोलिस कोठडीत रवानगी केली असून, दरोड्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. एसपी हे टोपणनाव असलेला अनिल सोनी सांगलीत दरोड्यावेळी पोलिस अधिकारी असल्याचे सांगून आतमध्ये घुसला होता.

येथील मार्केट यार्डजवळील रिलायन्स ज्वेल्सवर मुख्य सूत्रधार सुबोधसिंग याच्या टोळीने जून २०२३ मध्ये सशस्त्र दरोडा टाकला होता. पोलिस असून तपासासाठी असल्याचे सांगून टोळीने सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून त्यांना बांधून घालून पावणेसात कोटी रुपयांचे दागिने लांबवले होते. दरोड्यावेळी एक ग्राहक आतमध्ये आल्यानंतर तो घाबरून पळून जाताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. भरदिवसा टाकलेल्या दरोड्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांसमोर दरोडेखोरांना पकडण्याचे आव्हान होते.

सांगली पोलिसांनी कसून तपास करत सुबोधसिंगच्या टोळीने दरोडा टाकल्याचे निष्पन्न केले. सुबोधसिंगने कारागृहातून सूत्रे हलवून टोळीच्या माध्यमातून दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले. बऱ्याच प्रयत्नांनंतर सांगली पोलिसांनी सुबोधसिंगला ताब्यात घेऊन तपास केला. त्याच्याबरोबर दरोड्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या अंकुरप्रताप रामकुमार सिंग (वय २५, रा. तारवान, नौबातपूर, जि. पाटणा, राज्य बिहार), महंमद शमशाद महंमद मुख्तार (वय २३, रा. चेरिया, जि. बेगुसराय, राज्य बिहार) यांनाही अटक केली आहे.

दरोडा प्रकरणात डेहराडून येथून अनिल सोनी व शशांक सिंग या दोघांचा ताबा घेतला. सांगलीत न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दोघांना २ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. आतापर्यंत टोळीतील पाच जणांना अटक करण्यात यश आले आहे.

पोलिस असल्याचे भासवले

एसपी ऊर्फ अनिल सोनी याने दरोडा टाकताना पोलिस असल्याचे भासवले होते. तो टोळीमध्येही एसपी या नावानेच प्रसिद्ध आहे, तर शशांक सिंग याने कारागृहातून दरोड्यावर नियंत्रण ठेवले असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे तपास करत आहेत.

सांगलीनंतर डेहराडूनला दरोडा

सांगलीतील दरोड्यानंतर डेहराडून येथे रिलायन्स ज्वेल्सवर नोव्हेंबर २०२३ मध्ये दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात सहभागी असल्याच्या संशयावरून हरयाणा येथून एसपी ऊर्फ अनिल सोनी याला अटक केली होती.

Web Title: Two more arrested in Reliance robbery Sangli, taken into custody from Dehradun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.