आणखी दोन जोडप्यांची ‘डीएनए’ चाचणी
By admin | Published: May 22, 2017 11:45 PM2017-05-22T23:45:25+5:302017-05-22T23:45:25+5:30
आणखी दोन जोडप्यांची ‘डीएनए’ चाचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्या प्रकरणातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या आणखी दोन जोडप्यांचे नमुने ‘डीएनए’ तपासणीसाठी पोलिसांनी सोमवारी घेतले. मुलीचा गर्भ असल्याने त्यांनी गर्भपात केला असून, यामध्ये इचलकरंजी (जि. कोल्हापूर) व ऐनवडगाव (जि. बेळगाव) या गावच्या जोडप्यांचा समावेश आहे. पोलिसांनी आतापर्यंत डीएनएसाठी २३ जोडप्यांना शोधून काढले आहे.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर खिद्रापुरेचे भ्रूणहत्येचे रॅकेट उघडकीस आले होते. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळ येथे ओढ्यालगतच पुरले होते. जेसीबीने खुदाई केल्यानंतर तब्बल १९ भ्रूण सापडले होते. या भ्रूणांचे अवशेष ‘डीएनए’साठी यापूर्वीच पाठविले आहेत. पण ज्या महिलांचे गर्भपात केले होते; त्यांचेच हे भ्रूण आहेत का, याचा तपास करणे महत्त्वाचे होते. यासाठी पोलिसांनी येथे गर्भपात केलेल्या महिलांचा शोध सुरू ठेवला. दोन महिन्यापासून गर्भपात केलेल्या महिलांचा शोध सुरू आहे. या महिला प्रामुख्याने सांगली व कोल्हापूर जिल्"ातील तसेच कर्नाटकातील असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
पोटात वाढत असलेला गर्भ मुलीचा असल्याचे गर्भलिंग निदान तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर, अनेक महिला पतीच्या मदतीने खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपात करण्यास येत असत. खिद्रापुरेविरुद्ध भक्कम पुरावा गोळा करण्याचे, तसेच गर्भपात केलेल्या महिलांचा व त्यांच्या पतींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू ठेवले होते. यामध्ये त्यांना यशही येत आहे. आतापर्यंत २३ जोडप्यांना ‘डीएनए’ तपासणीसाठी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आहे. त्यांनीही गर्भपात केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. सापडलेल्या भ्रूणांच्या अवशेषासाठी या जोडप्यांची डीएनए तपासणी केली जात आहे. सोमवारी इचलकरंजी व ऐनवाडी येथील दोन जोडप्यांना ताब्यात घेऊन त्यांचे डीएनएसाठी नमुने घेतले. त्यांनी खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपात केल्याची कबुली दिली आहे.
बारा अहवाल मिळाले
आतापर्यंत बारा भ्रूणांच्या ‘डीएनए’ तपासणीचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. यामध्ये पाच भ्रूण मुलींचे, तर तीन मुलांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रयोगशाळेत अजूनही काही अहवाल प्रलंबित आहेत. खिद्रापुरेसह संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.