मलनिस्सारण केंद्रात गुदमरुन अभियंत्यासह दोघे ठार-सांगलीत घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:24 AM2018-05-27T00:24:35+5:302018-05-27T00:24:35+5:30

महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात सफाईचे काम करताना विषारी वायूमुळे अभियंत्यासह दोघे गुदमरुन ठार झाले. कोल्हापूर रस्त्यावरील भारतभीम जोतिरामदादा सावर्डेकर कुस्ती

Two murders, including an engineer, in the Sewing Center, Sangliat incident | मलनिस्सारण केंद्रात गुदमरुन अभियंत्यासह दोघे ठार-सांगलीत घटना

मलनिस्सारण केंद्रात गुदमरुन अभियंत्यासह दोघे ठार-सांगलीत घटना

googlenewsNext
ठळक मुद्देपहेलवानांच्या प्रसंगावधानामुळे दोघे बचावले

सांगली : महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात सफाईचे काम करताना विषारी वायूमुळे अभियंत्यासह दोघे गुदमरुन ठार झाले. कोल्हापूर रस्त्यावरील भारतभीम जोतिरामदादा सावर्डेकर कुस्ती आखाड्याजवळ शनिवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. आखाड्यातील पहेलवानांच्या प्रसंगावधानामुळे दोन कामगारांना वाचविण्यात यश आले आहे.

अभियंता उमाकांत प्रभाकर देशपांडे (वय ५०, रा. साईशीतल भवन, फ्लॅट क्रमांक ४, पत्रकारनगरजवळ, सांगली) व विठ्ठल शामलिंग शेरेकर (४५, हनुमाननगर, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. संजय सदाशिव कोथमिरे (३०, कोगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) व संजय सदाशिव माळी (२४, कवलापूर, ता. मिरज) अशी बचावलेल्या कामगारांची नावे आहेत. विषारी वायूमुळे ते गुदमरुन बेशुद्ध पडले होते. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जोतिरामदादा कुस्ती आखाड्याजवळ महापालिकेच्या ड्रेनेज योजनेंतर्गत मलनिस्सारण केंद्र आहे. या योनजेचा पुण्यातील अ‍ॅक्वाटेक शत प्रा. लि. या कंपनीस ठेका देण्यात आला आहे. योजनेच्या प्रकल्पातील २५ ते ३० फूट इंटकवेलची (विहिरीची) शनिवारी स्वच्छता करायची होती. यासाठी विठ्ठल शेरेकर यांनी विहिरीचे झाकण उघडले. त्यावेळी विषारी वायू बाहेर पडल्याने शेरेकर बेशुद्ध होऊन विहिरीत पडले. हा प्रकार पाहून देशपांडे त्यांना वाचविण्यासाठी विहरीत उतरले. पण एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात गुदमरुन त्यांचाही जागीच मृत्यू झाला. केंद्रातील संजय कोथमिरे व संजय माळी हेही या दोघांना वाचविण्यासाठी विहिरीत उतरत होते. तेवढ्यात आखाड्यातील पेहेलवानांनी धाव घेतली. तोपर्यंत कोथमिरे व माळी बेशुद्ध पडले होते. पेहेलवानांनी या चौघांना बाहेर काढून उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देशपांडे व शेरेकर यांना मृत घोषित केले. कोथमिरे व माळी यांना अतिदक्षता विभागात हलविले.
अभियंत्यासह दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच महापौर हारुण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार यांच्यासह अनेक नगरसेवकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

कार्यक्रम रद्द
महापालिकेच्यावतीने रविवारी सत्तर एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता; पण या घटनेमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर हारुण शिकलगार यांनी दिली.

पुण्यातून बदली अन् सांगलीत मृत्यू
अ‍ॅक्वाटेक शत प्रा. लि. या कंपनीत देशपांडे पुण्यात नोकरी करीत होते. तीन आठवड्यांपूर्वी कंपनीने त्यांची सांगलीत बदली केली होती. त्यांच्याकडे महापालिकेच्या ड्रेनेज योजनेंतर्गत मलनिस्सारण केंद्राच्या कामाची जबाबदारी दिली होती; पण कामगाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचाही बळी गेला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

भरपाई द्यावी!
मृत देशपांडे व शेरेकर यांना महापालिकेने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी महापालिका कामगार सभेने केली आहे. हे काम करताना आवश्यक खबरदारी घेण्यासाठी साधनसामग्री पुरविण्यात आली नाही. शासनाच्या नियमावलींची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे ही घटना घडली. पालिकेने दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना तातडीने भरपाई द्यावी. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सेवेत घ्यावे, अशी मागणी केली आहे.

कंपनीला जबाबदार धरणार : खेबूडकर
महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुदैवी आहे. पहेलवानांच्या प्रसंगावधानामुळे दोन कामगारांना वाचविण्यात यश आले. या पहेलवानांचा पालिकेतर्फे १५ आॅगस्टला सत्कार केला जाईल. तसेच ड्रेनेज योजनेंतर्गत मलनिस्सारण केंद्राच्या कामाचा ठेका ठाण्यातील एसएमसी या कंपनीला दिला होता; पण त्यांनी पुढे अन्य कंपनीला ठेका दिला असेल, तर याची काहीच कल्पना नाही. मात्र आम्ही या घटनेला ठाण्याच्या कंपनीलाच जबाबदार धरणार आहोत.

 

 कोल्हापूर रोडवरील याच इंटकवेलमध्ये शनिवारी दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला.मलनिस्सारणाच्या विहिरीत दोघांच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर याठिकाणी गर्दी झाली होती.

 

Web Title: Two murders, including an engineer, in the Sewing Center, Sangliat incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.