एकाच देवाच्या दोन पालखींच्या शर्यती, सांगलीतील 'या' गावात शंभरहून अधिक वर्षांची अनोखी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 01:29 PM2022-10-06T13:29:52+5:302022-10-06T13:34:26+5:30

राज्यासह परराज्यातील लोकांचे खास आकर्षण

Two palanquin races of Sri Revanasiddha Devas were held on Vijayadashami day at Vita in Sangli district | एकाच देवाच्या दोन पालखींच्या शर्यती, सांगलीतील 'या' गावात शंभरहून अधिक वर्षांची अनोखी परंपरा

एकाच देवाच्या दोन पालखींच्या शर्यती, सांगलीतील 'या' गावात शंभरहून अधिक वर्षांची अनोखी परंपरा

googlenewsNext

दिलीप मोहिते

विटा : सांगली जिल्ह्यातील विटा येथे विजयादशमी दिवशी संपन्न झालेल्या एकाच देवांच्या दोन पालखी शर्यतीत मूळस्थान श्री रेवणसिध्द देवांच्या पालखीने अंतिम क्षणी मुसंडी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. या पालखी शर्यतीवेळी विरोधी गटाच्या पालखीला अडथळा करणाऱ्या युवकांना पोलिसांचा चांगलाच प्रसाद मिळाला.

सुमारे शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेला आणि राज्यासह परराज्यातील लोकांचे खास आकर्षण ठरत असलेल्या विटा येथील पालखी शर्यती काल, बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडल्या. या पालखी शर्यती पाहण्यासाठी लाखो लोकांचा जनसागर लोटला होता. श्री रेवणसिध्द व मूळस्थानच्या श्री रेवणसिध्द या एकाच देवाच्या दोन पालखीच्या शर्यतीला सायंकाळी सव्वा पाच वाजता सुरूवात झाली.

विट्यातील उभी पेठ येथे असलेल्या श्री काळेश्वर महादेव मंदीरासमोर दोन पालख्या उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पालखी शर्यतीला सुरूवात झाली. पहिल्यांदा गांधी चौकातून पुढे जात असलेली मूळस्थानची पालखी विट्यातील युवकांनी रोखून धरली. त्यावेळी पालखीला अडथळा झाल्याने पोलिसांनी अडथळेखोर युवकांना चांगलाच चोप दिला.

मूळस्थानची पालखी सुमारे तीन ते चार मिनिटानंतर अडथळा केलेल्या युवकांच्या गराड्यातून बाहेर पडली. तोपर्यंत विट्याची पालखी बरेच अंतर कापून खानापूर नाक्याकडे धाव घेत होती. त्यावेळी मूळस्थानच्या लोकांनी विट्याची पालखी खानापूर रस्त्यावर रोखून धरली. त्यावेळी मूळस्थानच्या पालखीने झेप घेत विट्याच्या पालखीला गाठण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर विट्याच्या पालखीने अडथळा दूर करीत शिलंगण मैदानाकडे आगेकूच केली. ही पालखी शिलंगण मैदानात प्रवेश करीत असतानाच पुन्हा मूळस्थान व सुळेवाडीच्या लोकांनी विट्याची पालखी रोखून धरली. त्यावेळी पाठीमागून आलेल्या मूळस्थानच्या श्री रेवणसिध्द देवाच्या पालखीने मुसंडी मारत शिलंगण मैदान गाठत प्रथम क्रमांक पटकाविला.

या शर्यतीच्या सोहळ्यानंतर शिलंगण मैदानात सीमोल्लंघन कार्यक्रम पार पडला. माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रासह सर्वसामान्य लोकांनी आपट्यांची पाने देऊन विजयादशमीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हा नेत्रदिपक पालखी शर्यतीचा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. विटा पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: Two palanquin races of Sri Revanasiddha Devas were held on Vijayadashami day at Vita in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.