पैजेचा विडा महागात पडला, लाखाची शर्यत लावणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 05:32 PM2019-04-28T17:32:01+5:302019-04-28T17:34:56+5:30
सांगली मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळाली. विद्यमान खासदार संजय पाटील आणि महाआघाडी कडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार असे संकेत आहेत.
सांगली - लोकसभा निवडणुकांच्या निकालावर लागलेल्या पैज आता शर्यत लावणाऱ्यांना महागात पडणार आहेत. कारण, सांगलीत उमेदवारांच्या नावाने पैज लावणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकुमार लहू कोरे (विजयनगर) आणि रणजीत लालासाहेब देसाई (रा.शिपूर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
लोकसभेच्या रणधुमाळीत कधी काय होईल हे सांगता येणार नाही. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासूनच बरीच उलथापालथ दिसून आली. रोजच टीका, टोले, आरोप, प्रत्यारोप ऐकू येत आहेत. अशातच नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे सांगलीतील ही पैज. सांगतील चक्क एक लाख रुपयांची पैज दोन कार्यकर्त्यांमध्ये लागली आहे.
सांगली मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळाली. विद्यमान खासदार संजय पाटील आणि महाआघाडी कडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार असे संकेत आहेत. सांगली जिल्ह्यात कोण येणार हा रोजच चर्चेचा विषय बनत आहे. मिरजच्या मार्केट कमिटीमध्ये अशीच चर्चा चालू होती. त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते राजाराम कोरे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते रणजीत देसाई हे दोघे मित्र बसले होते. दोघांचेही नेते वेगळे जो तो त्याचाच उमेदवार निवडून येईल असे म्हणत होता, आणि शेवटी त्यांच्यात पैज लावायचे ठरले. पत्रकार आणि जेष्ठ लोकांना बोलावून तब्बल एका लाखाची पैज लावली. त्यांनी लिहून दिले आणि तसे चेकही जमा केले आहेत. 23 मेला निकाल काय येतो? कोणाचा नेता जिंकतो? त्यानुसार 24 मेला जिंकणाऱ्या नेत्याच्या कार्यकर्त्याला पैसे मिळणार आहेत. मात्र, तत्पूर्वी जाहीरपणे पैज लावणाऱ्या या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटकही करण्यात आली. त्यामुळे राज्यातील इतरही मतदारसंघात लागलेल्या अशाच शर्यंतींवरही गुन्हे दाखल होणार का, अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन गटांच्या दोन प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये एक लाखाची पैज लागली आहे. स्वाभिमानी पक्षाचे गोमटेश पाटील (माणगाव) यांनी खासदार शेट्टी यांच्यासाठी, तर येथील अरविंद खोत (माणगाववाडी) यांनी शिवसेनेचे धैर्यशील माने हे निवडून येणार यासाठी एक लाखाची पैज लावली आहे. तसेच उस्मानाबाद येथेही वाहनांच्या शर्यती लागल्या असून तसा करारही करण्यात आला आहे.