शिराळ्याजवळ अपघातात दोघे ठार

By admin | Published: January 5, 2016 01:00 AM2016-01-05T01:00:16+5:302016-01-05T01:00:16+5:30

दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक

Two people killed in an accident near the shrine | शिराळ्याजवळ अपघातात दोघे ठार

शिराळ्याजवळ अपघातात दोघे ठार

Next

शिराळा : पाडळीवाडी (ता. शिराळा) फाट्याजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन दोघे ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. अमोल अनिल नरुले (वय ३०, रा. पाटील पेट्रोलपंपामागे, इस्लामपूर, ता. वाळवा) व बबन परशुराम वाघमारे (४५, रा. हत्तेगाव, ता. शिराळा) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी दुपारी बाराच्यादरम्यान हा अपघात झाला.
अमोल नरुले शिराळ्याहून अंत्री खुर्दकडे मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच १० बीव्ही ४२४८) जात होते, तर बबन वाघमारे व त्यांचे वडील परशुराम रामचंद्र वाघमारे (७०) हेही मोटारसायकलवरून (क्र. एमएच १० एए ६१०३) अंत्री खुर्दकडून शिराळ््याकडे येत असता, पडळीवाडी फाट्यावर दोन्ही दुचाकींची धडक झाली. यामध्ये अमोल नरुले रक्तस्त्राव होऊन जागीच ठार झाले, तर बबन वाघमारे व परशुराम वाघमारे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र बबन वाघमारे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.परशुराम वाघमारे यांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार एस. एस. सुपनेकर तपास करीत आहेत. (वार्ताहर)
डबा आणताना काळाचा घाला
अमोल नरुले यांचे इस्लामपूर येथील गांधी चौकात भांड्याचे दुकान आहे, तर त्यांच्या आई शिराळा येथील श्री शिवछत्रपती विद्यालयात शिक्षिका आहेत. त्यांचे आजोळ अंत्री खुर्द आहे. सकाळी आई विजया नरुले यांना शाळेत सोडून जेवणाचा डबा आणण्यासाठी ते अंत्रीकडे निघाले असता, हा अपघात झाला.
रक्षाविसर्जनाहून परतताना अपघात
बबन वाघमारे मुंबई येथे कामाला आहेत. त्यांची भावजय सोनाबाई यांचे निधन झाले असून, त्यांच्या रक्षाविसर्जनासाठी ते गावी आले होते. रक्षाविसर्जन आटोपून रेड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी ते वडिलांना बरोबर घेऊन निघाले होते. यावेळी
काळाने त्यांच्यावर झडप घातली. बबन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार वर्षाचा मुलगा, नऊ वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Two people killed in an accident near the shrine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.