बेळगावजवळ अपघातात सांगलीचे दोघेजण ठार
By admin | Published: April 24, 2016 11:17 PM2016-04-24T23:17:45+5:302016-04-24T23:53:05+5:30
ट्रकची धडक : मृतात पोलिसाचा समावेश
सांगली : ट्रकने जोराची धडक दिल्याने मोटारीतील दोघेजण जागीच ठार झाले. अरुण भीमराव कदम (वय ४४, रा. गव्हर्न्मेंट कॉलनी) व सुहास पांडुरंग शेटके (५४, गावभाग, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. बेळगाव-खानापूर रोडवर देसूरजवळ अल्मा मोटर्सनजीक शनिवारी रात्री हा भीषण अपघात झाला. यामध्ये कदम यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. अरुण कदम हे पोलिस हवालदार होते. सांगली पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात ते नेमणुकीस होते.
सोनसळ (ता. कडेगाव) हे अरुण कदम यांचे गाव आहे. सांगली पोलिस दलात त्यांची २० वर्षे सेवा झाली आहे. नियंत्रण कक्षात नेमणूक झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून ते सांगलीतील गव्हर्न्मेंट कॉलनीतील वडिलांच्या फ्लॅटमध्ये राहत होते. बेळगाव जिल्ह्यात देसूर ही त्यांची सासूरवाडी आहे.
तिथे यात्रा असल्याने ते पत्नी व मुलासोबत मोटारीने दोन दिवसांपूर्वी देसूरला गेले होते. मोटारीवर सुहास शेटके चालक होते. यात्रा झाल्यानंतर ते शनिवारी रात्री सांगलीला परतण्यासाठी निघाले होते. ते बेळगावजवळ आल्यानंतर, भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारीला जोराची धडक दिली. यामध्ये मोटार रस्त्याकडेला उलटली.
या अपघातात कदम व शेटके यांचा जागीच मृत्यू झाला, तर कदम यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच त्यांचे नातेवाईक तातडीने बेळगावला रवाना झाले होते. (प्रतिनिधी)
मुले बचावली
कदम यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगी परीक्षा असल्याने त्यांच्यासोबत गेली नव्हती. फक्त मुलगा गेला होता. परीक्षा झाल्याने त्याला सुटी लागली आहे. त्यामुळे त्याने मामाकडे राहणार असल्याचा आग्रह धरून त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला.
त्यामुळे त्याला तिथेच सोडून कदम दाम्पत्य सांगलीला येण्यास निघाले होते. मुले त्यांच्यासोबत नसल्याने ती या अपघातातून बचावली.