शिरसगावचे दोघेजण अपघातात ठार
By admin | Published: April 16, 2017 11:48 PM2017-04-16T23:48:33+5:302017-04-16T23:48:33+5:30
दाम्पत्य जखमी; प्रकृती चिंताजनक; नांद्रेजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक
सांगली : दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाल्याने निमशिरसगाव (ता. कडेगाव) येथील दोघेजण ठार झाले. किसनराव ज्ञानू मांडके (वय ७०) व बाळासाहेब बाजीराव मांडके (४८) अशी त्यांची नावे आहेत. नांद्रे (ता. मिरज) येथे घुमट मळ्याजवळ रविवारी सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात झाला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.
तसेच या अपघातात सांगलीतील विजयनगर येथे रेल्वे पुलाजवळ राहणारे जालिंदर गणपती साळुंखे (६०) व त्यांच्या पत्नी नलिनी (५०) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, पण प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना मिरजेतील खासगी रुग्णालयात हलविले आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी ही वाहने जप्त केली आहेत.
नातेवाईक आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी साळुंखे दाम्पत्य रविवारी सकाळी दुचाकी (क्र. एमएच १०, एएस ३२३)वरून चिंचणी-अंबक (ता. कडेगाव) येथे निघाले होते. याचवेळी किसनराव व बाळासाहेब मांडके हे दुचाकी (क्र. एमएच १०, एक्स ४७७५) वरून किसनराव मांडके यांचे सांगलीतील जावई काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी सांगलीत येत होते. ते नांद्रेतील घुमट मळ्याजवळ आले असता, या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये किसनराव व बाळासाहेब मांडके रस्त्यावर उडून पडले. साळुंखे दाम्पत्यही रस्त्यावर पडले. यामध्ये किसनराव जागीच ठार झाले, तर अन्य तिघांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने त्यांना तातडीने उपचारार्थ हलविण्यात आले. (प्रतिनिधी)
चुलता, पुतण्याच्या अपघाती मृत्यूने शिरसगाववर शोककळा
कडेगाव : शिरसगाव येथील माजी सरपंच किसनराव ज्ञानू मांडके व त्यांचा पुतण्या बाळासाहेब बाजीराव मांडके या दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली.
सांगलीत आजारी असलेल्या पाहुण्यांना पाहण्यासाठी निघालेले चुलता-पुतण्या परत आलेच नाहीत. आली ती त्यांच्या मृत्यूची बातमी. सांगलीला जातानाच नांद्रे, वसगडेजवळ अपघात झाला आणि या दोघांचाही यामध्ये मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूने शिरसगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. किसनराव मांडके हे माजी सरपंच होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा सख्खा पुतण्या बाळासाहेब मांडके हे सह्णाद्री साखर कारखान्यात नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. दोघांच्याही मृतदेहांवर रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन बुधवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शिरसगाव येथे होणार आहे.