सांगलीत मद्यप्राशन करून दोन पोलिस अधिकाऱ्यांचा धिंगाणा

By admin | Published: January 2, 2017 12:05 AM2017-01-02T00:05:29+5:302017-01-02T00:05:29+5:30

बुधगावला ढाब्यावरून सुरुवात : कॉलेज कॉर्नरवर रिव्हॉल्व्हर काढले

Two police officers threw acid on Sangli | सांगलीत मद्यप्राशन करून दोन पोलिस अधिकाऱ्यांचा धिंगाणा

सांगलीत मद्यप्राशन करून दोन पोलिस अधिकाऱ्यांचा धिंगाणा

Next

सांगली : महापालिका क्षेत्रातील दोन मोठ्या पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा पदांवर काम करणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांनी मद्य प्राशन करून जोरदार धिंगाणा घातला. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला, पण हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बुधगाव (ता. मिरज) येथील एका ढाब्यावरून या अधिकाऱ्यांचा सुरू झालेला धिंगाणा सांगलीतील कॉलेज कॉर्नरपर्यंत सुरू होता. यातील एका अधिकाऱ्याने कमरेचे रिव्हॉल्व्हर काढून दहशत माजविण्याचाही प्रयत्न केला. धिंगाणा घातलेला सहायक पोलिस निरीक्षक सहा महिन्यांपूर्वी सांगलीत बदली होऊन आला आहे. तो शहरातील एका पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे, तसेच संबंधित उपनिरीक्षक पूर्वी शहर पोलिस ठाण्यात होता. सहा महिन्यांपूर्वी त्याची महापालिका क्षेत्रातीलच एका पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. हे
दोघेही अन्य जिल्ह्यांत यापूर्वी नेमणुकीस होते. त्यामुळे त्यांच्यात चांगली ओळख आहे. सांगलीला एकत्रित बदली होऊन आल्यानंतर त्यांनी जुन्या मैत्रीला उजाळा दिला. ‘थर्टी फर्स्ट’पूर्वीच ‘पार्टी’ करण्यासाठी ते बुधगाव येथील पेट्रोल पंपाजवळील ढाब्यावर जेवायला गेले होते. जेवणाची ‘आॅर्डर’ देण्यावरून त्यांनी ढाब्यावरील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. ढाब्याचा मालक व कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. ‘आम्ही कोण आहे माहीत नाही का?, उद्या ढाबा बंद करेन’, अशी दमबाजी करीत त्यांनी जेवणावर ताव मारला. जेवणाचे बिल देतानाही त्यांनी वाद घातला.
त्यानंतर दोघे दुचाकीवरून सांगलीत आले. कॉलेज कॉर्नरवर एका हातगाडीवरही पुन्हा काही तरी खाण्यासाठी ते थांबले. तिथेही त्यांनी वाद घातला. उपनिरीक्षकाने तर स्वसंरक्षणार्थ कमरेला लावलेले रिव्हॉल्व्हर काढून तेथे दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दोघांचा धिंगाणा पाहून भीतीने लोकांची पळापळ झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर या दोघांचा प्रताप गेल्यावर यातील सहायक पोलिस निरीक्षकावर पोलिस ठाणेस्तरावर तात्पुरती कारवाई झाली. त्याची पोलिस मुख्यालयाकडे बदली केली आहे, पण उपनिरीक्षकावर कोणतीही कारवाई झाली नाही. दोघांनी घातलेल्या धिंगाण्याची मात्र पोलिस दलात तसेच शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)

पोलिसांचा ससेमिरा
पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये, यासाठी ढाब्याचा मालक व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची कुठेही चर्चा केली नाही. कॉलेज कॉर्नरवरील खाद्यपदार्थ विक्रेतेही गप्प बसले. त्यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनीही आम्हाला काही माहिती नाही, असे सांगून अधिक बोलण्याचे टाळले.

Web Title: Two police officers threw acid on Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.