शेततळ्यात बुडून दोन बहिणींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:14 AM2017-09-25T00:14:16+5:302017-09-25T00:14:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : तालुक्यातील करोली (एम) येथे शेततळ्यात बुडाल्याने जिजाबाई सतीश वाघ (वय १३), केशवनी सतीश वाघ (६) या दोन सावत्र बहिणींचा मृत्यू झाला. जिजाबाई व केशवनी या शनिवारी सायंकाळी शेतात जळण आणण्यासाठी गेल्या असता, शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
करोली (एम) येथील वाघमारे वस्तीवर राहणाºया जिजाबाई व केशवनी या सावत्र बहिणी शनिवारी शाळेतून घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजता जळण आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. सतीश वाघ यांची अर्धा एकर द्राक्षबाग असल्याने त्यांनी शंभर फूट लांब व रूंद शेततळे खोदले आहे. शेततळ्यात प्रथमच पाणी सोडले असल्याने दोघी बहिणी शेतात जळण आणण्यासाठी गेल्यानंतर शेततळे पाहण्यासाठी गेल्या; मात्र काठावरून पाणी पाहताना शेततळ्यात घसरून पडल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला.
मुलींची आई स्नेहा वाघ या जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या. वडील सतीश वाघ कामानिमित्त मिरजेला गेले होते. घरात आजोबा एकटेच होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत दोघीही घरी परत आल्या नसल्याने आई-वडिलांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. शेततळ्यात पाहिले असता सुमारे पाच फूट पाण्यात दोघींचे मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. जिजाबाई ही मणेराजुरी कन्या शाळेत आठवीत, तर केशवनी वस्तीवरील शाळेत दुसरीत शिकत होती.
पशुपालन व शेती करणाºया सतीश वाघ यांची गरीब परिस्थिती असून, त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या. दोघी मुलींच्या आकस्मिक मृत्यूमुळे वाघ कुटुंबियांवर मोठा आघात झाला. दोघींचे मृतदेह सापडल्यानंतर माता-पित्याचा आक्रोश सुरू होता. दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलीसपाटील मनीषा पाटील यांनी ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मोहन जाधव, हवालदार भिंताडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे.