उमदीत पाण्यात बुडून दोघा बहिणींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:25 AM2021-09-13T04:25:11+5:302021-09-13T04:25:11+5:30
उमदी : उमदी (ता. जत) येथे ओढ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी ...
उमदी : उमदी (ता. जत) येथे ओढ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय ११) व रेणुका शिवानंद ऐवळे (वय ७) अशी मृतांची नावे आहेत. उमदी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, उमदी येथील ओढ्यालगत शिवानंद ऐवळे हे कुटुंबासह राहतात. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. रविवारी सकाळी ते व पत्नी शेतात कामाला गेले होते. या वेळी तिन्ही मुले घरी होते. दुपारी दीडच्या सुमारास दोन्ही मुली व त्यांचा भाऊ मायाप्पा (वय ६) असे तिघे घरानजीक असणाऱ्या ओढ्यात पोहायला गेले. लक्ष्मी व रेणुका पहिल्यांदा ओढ्यात उतरल्या होत्या, तर मायाप्पा कपडे काढत होता. काही वेळातच दोघीही ओढा पात्रात दिसेनात. हे पाहून मायाप्पा भयभीत होऊन रडू लागला. हे पाहून ओढ्याच्या काठावर जनवारे चारण्यासाठी आलेले संभाजी माने व प्रकाश वाघमारे यांंनी घटनास्थळी धाव घेतली. मायाप्पाने घडला प्रकार दोघांना सांगितला. यानंतर संभाजी व प्रकाश यांनी ओढा पात्रात उड्या मारल्या. त्यांनी दोन्ही बहिणींचा शोध घेत त्यांना बाहेर काढले; पण तोपर्यंत उशीर झाला होता. दोघींचे मृतदेह ओढ्याच्या काठावर ठेवून संभाजी व प्रकाश यांनी नागरिकांसह उमदी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जत येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
चाैकट
पाण्याचा अंदाज चुकला
उमदीतील ओढा पात्रात ज्या ठिकाणी या मुली पोहण्यास गेल्या होत्या त्या ठिकाणी खोली होती. यामुळे मुलींना पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्या बुडाल्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. यावेळी ऐवळे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.