संखजवळ अपघातात दोघे सख्खे मेहुणे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:41+5:302021-09-09T04:32:41+5:30
फोटो : ०८०९२०२१एसएएन०१, ०२ : अपघातग्रस्त दुचाकी लोकमत न्यूज नेटवर्क संख : जत तालुक्यातील लमाणतांडा फाटा ते पांढरेवाडी रस्त्यावर ...
फोटो : ०८०९२०२१एसएएन०१, ०२ : अपघातग्रस्त दुचाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यातील लमाणतांडा फाटा ते पांढरेवाडी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन युवकांचा मृत्यू व एकजण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये सख्ख्या मेहुण्यांचा समावेश आहे. चंद्रूबा सुखदेव लेंगरे (वय ३२), संभाजी धोंडिबा तांबे (३५, दोघे पांढरेवाडी, ता. जत) अशी मृतांचे नावे आहेत. दशरथ बिरा करे (३५, रा. खंडनाळ, ता. जत) गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री आठला घडली.
पूर्व भागातील संख-दरीबडची रस्त्यावर लमाणतांडा फाटा आहे. मंगळवारी रात्री चंद्रूबा लेंगरे, संभाजी तांबे दुचाकीवरून (क्र. एमएच १० डीएच ९२१७) संखकडून पांढरेवाडीला जात होते. गाडी चंद्रूबा लेंगरे चालवित होते. दशरथ करे दुसऱ्या दुचाकीवरून (क्र. एमएच १४ एस ६२९९) खंडनाळ येथील देवाच्या कार्यक्रमाचे जेवण करुन दरीबडची रस्त्यावरील घराकडे निघाले होते. पांढरेवाडी रस्त्यावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. लेंगरे व तांबे यांना गाडीवरून रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. चंद्रूबा लेंगरे यांची स्थिती चिंताजनक असल्याने कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पहाटे त्यांचा मृत्यू झाला, तर संभाजी तांबे यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सकाळी त्यांचाही मृत्यू झाला. दोघांवर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दशरथ करे यांचा पाय मोडला आहे. त्यांच्यावर जत येथे उपचार सुरू आहेत.
धडक इतकी जोराची होती की, चंद्रूबा, संभाजी दक्षिणेकडे निघाले होते. परंतु गाडीला धडक बसल्यावर गाडीचे तोंड विरुद्ध उत्तर दिशेला झाले. दोन्ही दुचाकी रस्त्याकडेला पडल्या होत्या. रस्त्यावर रक्त पडले होते. मृतांच्या चप्पल गाडीलाच अडकून पडल्या आहेत.
दोन्ही कुटुंबांवर शोककळा
मृत संभाजी तांबे यांना चंद्रूबा लेंगरे यांची सख्खी बहीण दिली आहे. त्यामुळे नात्याने ते मेहुणे-मेहुणे आहेत. लेंगरे यांच्या सख्ख्या चुलत भावाचे लग्न असल्याने मंगळवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. घरात लग्नाचे वातावरण असताना दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.