पोषण आहाराच्या १५० रुपयांसाठी दोन हजारांचे बँक खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:13+5:302021-07-02T04:18:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : उन्हाळी सुट्टीत पोषण आहार देता न आल्याने त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : उन्हाळी सुट्टीत पोषण आहार देता न आल्याने त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३५ दिवसांच्या पोषण आहारापोटी १५६ ते २३४ रुपये मिळणार आहेत, त्याचे खाते उघडण्यासाठी मात्र दोन हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. शासनाच्या या आंधळ्या कारभाराबद्दल पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
लॉकडाऊन काळात शाळा बंद असताना पोषण आहार घरपोहोच केला गेला. काहीवेळा पालकांना शाळेत बोलवून देण्यात आला. मे महिन्यात मात्र उन्हाळी सुट्टी गृहित धरण्यात आली. पोषण आहारापोटी रोख पैसे देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढण्याचे फर्मान निघाले. हे फर्मानच आता कळीचा मुद्दा ठरले आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खात्यावर किमान दोन हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतात. शिवाय खाते उघडण्यासाठी फोटो, झेरॉक्स आदी दीडशे रुपयांपर्यंत खर्च येतो. कोरोनाच्या धोकादायक स्थितीत पाल्याला बँकेत न्यावे लागणार आहे. याशिवाय पोषण आहाराचे पैसे जमा झाल्यावर या खात्याचा काहीच वापर होणार नाही.
बॉक्स
खात्यासाठी २,०००, मिळणार १५०
- बँकेत खाते काढण्यासाठी किमान १५० रुपये खर्च येणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढल्यास त्यावर २ हजार रुपयांची शिल्लक सक्तीची आहे.
- पाल्य अज्ञान असल्याने पालकासोबत संयुक्त खाते उघडावे लागेल. कोरोनाच्या धोकादायक स्थितीत मुलांना बँकेच्या गर्दीत न्यावे लागेल.
- खाते काढून शाळेत पासबुकची झेरॉक्स द्यावी लागेल. त्यासाठी ९ जुलै पर्यंतची मुदत आहे. पण इतक्या तातडीने पासबुक मिळणार नसल्याचे बँकेत सांगितले जात आहे.
- इतक्या उठाठेवी केल्यानंतरही शासनाकडून फक्त १५६ ते २३४ रुपये मिळणार आहेत. यानंतर खाते वापराविनाच राहणार आहे.
कोट
पालकांच्या खात्यावर पैसे जमा करा
पोषण आहाराच्या पैशांसाठी स्वतंत्र खात्याची सक्ती करु नका. सर्रास पालकांची खाती बँकेत आहेत, त्यावरच पैसे जमा करावेत. दीड-दोनशे रुपयांसाठी दोन हजार रुपये खर्चून खाते काढणे शक्य नाही.
- हरिभाऊ साळुंखे, पालक
एकदा खाते काढल्यानंतर त्याचा नंतर उपयोग नसेल. त्यामुळे शासनाने दर महिन्याला पोषण आहार देण्याऐवजी त्याचे थेट पैसेच बँकेत जमा करावेत. यामुळे खाते वापरातही राहील.
- देवेंद्र कोरबू, पालक
कोट
विष्णू कांबळे, पालक
पॉईंटर्स
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार १५६ रुपये
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार २३४ रुपये
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी ?
पहिली ३९,५२६, दुसरी ४२,६२७, तिसरी ४३,६५८, चौथी ४३,६१५, पाचवी ४४,४८३, सहावी ४३,५३६, सातवी ४३,६०२, आठवी ४४,०९५