अल्पसंख्याक महामंडळाकडे दोन हजार कोटींची तरतूद करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:37+5:302021-01-16T04:31:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यातील अल्पसंख्याक समाजाला शैक्षणिक वगळता इतर कर्ज योजना निधीअभावी बंद आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात मौलाना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यातील अल्पसंख्याक समाजाला शैक्षणिक वगळता इतर कर्ज योजना निधीअभावी बंद आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळास दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करून कर्ज योजना सुरू कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युसूफ ऊर्फ लालू मेस्त्री यांनी मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांकडे केली आहे.
मेस्त्री म्हणाले की, अल्पसंख्यांक लोकसमूहाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी शासनाने मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली होती. २००९ पर्यंत अल्पसंख्यांक समाजातील सर्वच घटकांना थेट कर्ज योजना, मुदत कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, बीज भांडवल कर्ज योजना, महिला समृद्धी कर्ज योजना, मायक्रो फायनान्स कर्ज योजनांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा होत होता. त्यानंतर केवळ शैक्षणिक कर्ज योजना चालू असून, इतर योजना बंद केल्या.
यंदा कोविडमुळे महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजातील लाखो लोकांचे उद्योग धंदे
उद्ध्वस्त झाले. लाखो तरुण बेरोजगार झाले. त्या तरुणांना पुन्हा व्यवसायात उभे करण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळास येत्या अर्थसंकल्पात कमीत कमी
दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करून तरुणांना कर्ज योजनेतून मदत करावी. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. राज्यातील सर्वच आमदारांनाही पत्र पाठविणार असून, त्यांनी याचा पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही मेस्त्री यांनी व्यक्त केली.