दोन चिमुकल्या भावांचा बुडून मृत्यू
By Admin | Published: April 25, 2017 11:14 PM2017-04-25T23:14:21+5:302017-04-25T23:14:21+5:30
दोन चिमुकल्या भावांचा बुडून मृत्यू
उंब्रज : येथील कृष्णा व तारळी नदीच्या संगमावर पोहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने उंब्रजकर सुन्न झाले असून, ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान येथील जयविजय चौकात राहणाऱ्या कुऱ्हाडे कुटुंबातील रुद्र राजेंद्र्र कुऱ्हाडे (वय ७), बाबू राजेंद्र कुऱ्हाडे (५) हे सख्ख्ये भाऊ पोहण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या कृष्णा-तारळी नदीच्या संगमावर गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शेजारील एक लहान मुलगा होता. रुद्र व बाबू हे दोघे पाण्यात खोलवर गेल्यानंतर पाण्यात बुडू लागले. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत असलेला लहान मुलगा घडलेली घटना सांगण्यासाठी जयविजय चौकात ओरडत आला. त्यानंतर तेथील युवक व नागरिकांनी संगमाकडे धाव घेतली. त्यांनी तातडीने पात्रात उतरून मुलाचा शोध घेऊन मुलांना बाहेर काढले. या दोघांपैकी एकजण जागीच मृत झाला होता, तर दुसरा बऱ्यापैकी शुद्धीवर होता. त्याला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला. कुऱ्हाडे कुटुंब हे अतिशय गरीब कुटुंब आहे. या मुलांचे वडील राजेंद्र हे ट्रक चालक आहेत, तर मुलाची आई मोलमजुरी करते. ही अनपेक्षित घटना घडल्यानंतर घरासमोर दोन लहान चिमुकल्यांचे मृतदेह दिसल्यानंतर कुऱ्हाडे कुटुंबाने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या दोन चिमुकल्यांवर रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)