कवठेमहांकाळमध्ये दुचाकी चाेरट्यांची टाेळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:16+5:302021-06-24T04:19:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : मोटरसायकल चोरी करणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांच्या टोळीला कवठेमहांकाळ पाेलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : मोटरसायकल चोरी करणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांच्या टोळीला कवठेमहांकाळ पाेलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल नऊ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या पथकाने २१ जून रोजी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात नाकाबंदी लावली होती. यावेळी नीलेश आप्पासाहेब पवार (रा. कवठेमहांकाळ) हा हरियाणामध्ये नाेंद असलेली दुचाकी (क्र. एचआर ०२ एस ८३३९) घेऊन निघाला हाेता. त्याला थांबवून पाेलिसांनी दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे नसल्याने त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरली असल्याचे सांगितले. कवठेमहांकाळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अधिक चौकशी केली असता त्याने भाऊ गणेश आप्पासाहेब पवार व मित्र अमोल मनोहर निकम (दोघेही रा. कवठेमहांकाळ) यांच्या मदतीने नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पाेलिसांनी गणेश पवार व अमाेल निकम या दाेघांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडून चाेरीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या.
पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जत विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे, पोलीस नाईक आनंद जाधव, विनोद चव्हाण, ज्ञानदेव पुणेकर, प्रताप देसाई, विक्रम चव्हाण, मनोज एडके यांनी ही कारवाई केली.
ही वाहने ज्यांची असतील त्यांनी कागदपत्रांसह कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी केले आहे.