दुचाकीचे चायनीज ‘हेडलाईट’ घेताहेत बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:29 PM2019-05-17T23:29:10+5:302019-05-17T23:32:27+5:30
दुचाकीला चायनीज ‘एलईडी हेडलाईट’ लावण्याची ‘क्रेझ’ तरुणांमध्ये वाढली आहे. या ‘हेडलाईट’चा प्रकाश डोळ्यांवर पडताच समोरील वाहनधारकास काहीच दिसत नाही. परिणामी अपघात होऊन अनेकांचे बळी जात आहेत. विशेषत:
सचिन लाड ।
सांगली : दुचाकीला चायनीज ‘एलईडी हेडलाईट’ लावण्याची ‘क्रेझ’ तरुणांमध्ये वाढली आहे. या ‘हेडलाईट’चा प्रकाश डोळ्यांवर पडताच समोरील वाहनधारकास काहीच दिसत नाही. परिणामी अपघात होऊन अनेकांचे बळी जात आहेत. विशेषत: चायनीज हेडलाईटमुळे रात्रीचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत असली तरी, वाहनाला चायनीज हेडलाईट लावण्याचे भूत तरुणांच्या डोक्यातून कमी झालेले दिसत नाही.
अनेक कंपन्यांनी महागड्या दुचाकींचे उत्पादन केले आहे. दीड लाखापासून अडीच लाख रुपयांपर्यंतच्या या दुचाकीला कंपन्यांकडून पांढऱ्या ‘एलईडी हेडलाईट’ बसविल्या जात आहेत. पण या हेडलाईटच्या प्रकाशाचा समोरील वाहनधारकांवर काहीच परिणाम होऊ नये, याची कंपन्यांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. ‘आरटीओं’कडून दुचाकीचे पासिंग झाल्यानंतर मात्र तरुण मंडळी हा कंपनीचा हेडलाईट काढून चायनीज एलईडी हेडलाईट वाहनास बसवित आहेत. याचा प्रकाश डोळ्यावर परिणाम करीत आहे. प्रकाश पडताच समोरील वाहनधारकाचे डोळे दीपतात. अंधारी येते. त्याला काहीच दिसत नाही. गाडी जर वेगात असेल, तर तो वाहनधारक रस्त्यावर पडतोच किंवा दुसºया वाहनाला धडकतो. यामध्ये काही वाहनधारकांचा बळीही गेला आहे. वाहतूक पोलिसांकडून चायनीज हेडलाईटच्या दुचाकीवर कारवाई होत आहे. परंतु तरीही तरुण मंडळींमध्ये हेडलाईट बदलून लावण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.
चायनीज हेडलाईटचे दर साठ रुपयांपासून ते चारशे रुपयांपर्यंत आहेत. काही हेडलाईट तर ब्रेक मारल्यानंतर गोल फिरतात. तसा त्याचा प्रकाशही समोरील वाहनधारकांवर परिणाम करतो. वाहतूक नियमांचा भंग करून गॅरेजमधून अशाप्रकारचे हेडलाईट सर्रासपणे बसवून दिले जात आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी प्रवास करणे जीवघेणे ठरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात तर अशाप्रकारचे हेडलाईट बसविण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा पोलिसांना चायनीज हेडलाईट असलेल्या दुचाकी अडविणे कठीण बनते. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला तरी, दुचाकीस्वार भरभाव वेगाने निघून जातात. काही वेळेला तर तीव्र प्रकाशामुळे पोलिसांनाच ते दिसत नाहीत. याबाबत आरटीओ कार्यालयाकडून तर कारवाई होताना दिसतच नाही.हा प्रकार रोखण्यासाठी पोलीस व आरटीओ विभागाने संयुक्तपणे मोहीम उघडण्याची गरज आहे.
कानठळ्या बसविणाऱ्या हॉर्नचे आकर्षण
शहरी व ग्रामीण भागातील दुचाकी व चारचाकी वाहनधारक आपल्या वाहनाला मोठ्या आवाजाचे, डेसीबल मर्यादेचा विचार न करता बनविलेले अधिक क्षमतेचे कर्णकर्कश हॉर्न बसवत आहेत. ठिकठिकाणच्या गॅरेजमधून असे हॉर्न राजरोसपणे बसवून घेतले जात आहेत. याच्या आवाजामुळे अनेकांच्या कानांचे पडदे फाटून जायबंदी होण्याची वेळ आली आहे. चित्रविचित्र आवाजाच्या हॉर्नवर बंदी असतानाही, त्यांचा वापर सुरूच आहे. सध्या बाजारात ३० ते ४० विविध प्रकारचे हॉर्न उपलब्ध आहेत. वाहन कायद्यात कोणत्या वाहनाला किती डेसीबल क्षमतेचे हॉर्न वापरावेत, याचे नियम ठरवून दिले आहेत. मात्र याबद्दल अनेकजण अनभिज्ञ आहेत.