Sangli: दुचाकीस धडकून पोलिसांची जीप उलटली, दुचाकीस्वारासह तिघे पाेलिस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 12:21 PM2023-10-10T12:21:34+5:302023-10-10T12:24:02+5:30
जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले
बेडग : बेडग (ता. मिरज) येथील रामनगरजवळ पाेलिसांच्या जीपची धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जीपमधील तीन पाेलिस कर्मचारीही किरकाेळ जखमी झाले. दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला असून, जीपचेही माेठे नुकसान झाले. सोमवार, दि. ९ रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली.
मिरज उपविभागीय पाेलिस कार्यालयाकडील निर्भया पथक सायंकाळी जीपमधून (एमएच १० एन ०६४३) कार्यक्षेत्रामध्ये गस्तीवर हाेते. आरग-मिरज रस्त्यावर बेडग येथील रामनगरजवळ समाेरून भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकीस ( केए २३ इएस १३४५) पाेलिसांच्या जीपची जाेरदार धडक बसली. अपघातात दुचाकीस्वार महादेव रायाप्पा निवलगी (रा. मदभावी, ता. अथणी) हा गंभीर जखमी झाला, तर जीपमधील पाेलिस उपनिरीक्षक संभाजी धेंडे, हवालदार अजित कोळेकर व इरवंत हेमलवाड यांना किरकोळ दुखापत झाली.
अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या बाजूस उडून पडली, दुचाकीस्वार महादेव निवलगी रस्त्याकडेला फेकले गेले. तसेच पाेलिसांची जीप रस्त्यालगतच्या गटारीमध्ये जाऊन उलटली. तत्काळ सर्व जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच मोटार परिवहन विभागाचे पाेलिस निरीक्षक सचिन दंताळे यांनी घटनास्थळी भेट दिली. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. अधिक तपास सुरू आहे. पाेलिसांच्या वाहनाने दुचाकीस धडक दिल्याचे वृत्त समजताच अपघातस्थळी माेठी गर्दी झाली हाेती.