तासगाव तालुक्यात दुचाकी, विद्युत मोटर चाेरणारी टोळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:54+5:302021-07-22T04:17:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : तासगाव तालुक्यातील विसापूर, वंजारवाडी, लिंब, आरवडे परिसरातून विद्युत मोटर चोरणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तासगाव तालुक्यातील विसापूर, वंजारवाडी, लिंब, आरवडे परिसरातून विद्युत मोटर चोरणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तासगाव येथे अटक केली. रोहित राजेंद्र पाटील (वय २३, रा. ढवळी), ओंकार हणमंत चवदार (२१), किरण मारुती खरमाटे (२२) आणि संदेश महेश ओगलमोगले (२५, तिघेही रा. वंजारवाडी, ता. तासगाव) आणि मोटर विकत घेणारा विजय शिवाजी खरमाटे (२६, रा. ढवळी) अशी पाच संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून दोन दुचाकी व सात विद्युत मोटर असा एक लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तासगाव तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी एलसीबीचे पथक गस्तीवर असताना, तासगाव तालुक्यातील विविध ठिकाणी चोरी केलेली विद्युत मोटरी विकण्यासाठी संशयित तासगावात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तासगाव-विटा रोडवर ढवळी फाटा येथे सापळा रचून संशयिताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या विनाक्रमांकाच्या दुचाकीबाबत माहिती विचारली असता, ते उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागले, तर सोबत असलेल्या मोटरीचीही माहिती देऊ शकले नाहीत. त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता, मोटारसायकली चोरीच्या असून, एक हातनोली येथून तर एक पाडळी येथून चोरल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय विसापूर, वंजारवाडी, तूरची, लिंब, आरवडे येथून मोटरी चोरल्याचेही संशयितांनी सांगितले. चोरलेल्या मोटरी या विजय खरमाटे यास विकल्याचे सांगितले. त्यानुसार ढवळी येथे जात पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. दुचाकी चोरी व मोटर चोरीचे नऊ गुन्हे तासगाव पाेलिसात दाखल आहेत. त्यानुसार दुचाकी व मोटरी चाेरणारे चौघे व चोरीचे पंप विकत घेणारा एक अशा पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. या टोळीकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप ढेरे, मच्छिंद्र बर्डे, सतीश आलदर, जितेंद्र जाधव, संदीप गुरव, अनिल कोळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.