दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे
By admin | Published: May 9, 2017 11:39 PM2017-05-09T23:39:53+5:302017-05-09T23:39:53+5:30
दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहात प्रसुती झालेल्या एका महिलेची हेळसांड केल्याप्रकरणी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी निलंबित केलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांवरील कारवाई मंगळवारी स्थायी समिती सभेत रद्दबातल ठरविण्यात आली. या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेत, त्यांच्या बदलीवर मात्र शिक्कामोर्तब केले.
जागतिक महिला दिनाच्या एक दिवस आधी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहात एक महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. पण या महिलेवर उपचार करण्यास तेथील कर्मचाऱ्यांनी विलंब केला. त्यात डॉक्टर जान्हवी दोरकर या उशिरा रुग्णालयात दाखल झाल्या. तोपर्यंत गर्भाशयातील बाळाने पोटात शौच केल्याने डॉक्टरांनी महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. पण रुग्णवाहिकेसोबत कोण जाणार, यावरून प्रसुतिगृहातील कर्मचाऱ्यांत वाद झाला. रुग्णवाहिकेतून गर्भवती महिलेला नेत असताना काँग्रेस भवनजवळ रुग्णवाहिकेतच तिची प्रसुती झाली. याबाबत प्रसारमाध्यमातून वृत्त प्रसिध्द होताच आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी चौकशीचे आदेश दिले.
आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी याप्रकरणी चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला होता. अहवालातही डॉ. कवठेकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जान्हवी दोरकर, सफाई कर्मचारी पूनम गोवर, इनचार्ज सिस्टर मीना लोंढे यांच्यावर ठपका ठेवला होता. त्यानुसार आयुक्तांनी डॉ. दोरकर यांना कार्यमुक्त केले, तर गोवर व लोंढे या दोघांना निलंबित केले होते. या कारवाईविरूद्ध गोवर व लोंढे यांनी स्थायी समितीकडे अपील केले होते. त्यावर मंगळवारी सभेत चर्चा झाली. गोवर व लोंढे यांचे निलंबन मागे घेण्यात आले, तर त्यांच्या बदलीची कारवाई मात्र कायम ठेवली.
सभेत पावसाळी मुरूमावर चर्चा झाली. बसवेश्वर सातपुते यांनी, मुरूम कधी देणार आहात?, असा सवाल करीत, आयुक्तांचा पावसाळ्यात मुरूम टाकण्यास विरोध आहे. त्यात पाऊस झाल्यास वाहने उपनगरात जात नाहीत. मग नागरिकांना कधी मुरूम मिळणार?, असा जाब विचारला. त्यावर उपायुक्तांनी, आवश्यक ठिकाणी मुरूम टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. स्ट्रिट लाईट साहित्य खरेदीच्या ३० लाख रुपयांच्या कामांना सभेत मंजुरी देण्यात आली. नालेसफाईचे कामही आठ दिवसात सुरू करण्याची सूचना सभापती हारगे यांनी प्रशासनाला दिली.