दोन वर्षात जिल्हा बेघरमुक्त करा
By admin | Published: May 19, 2017 11:45 PM2017-05-19T23:45:51+5:302017-05-19T23:45:51+5:30
दोन वर्षात जिल्हा बेघरमुक्त करा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात साडेसहा हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. यातील ४० टक्के नागरिकांना निधीचा पहिला हप्ताही मिळाला आहे. बेसलाईन सर्व्हेप्रमाणे सांगली जिल्ह्यात अद्याप १५ हजार नागरिक बेघर आहेत. ही एक चांगली संधी मानून आगामी दोन वर्षात १५ हजार घरकुले बांधावीत. यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व अन्य मागासवर्गीय लोकांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.
मिरज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, शासनाच्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांची कामे मिशन मोडवर राबवा. शाश्वत पाण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना या विकास योजनांची कामे मिशन मोडवर राबवा. त्यात कुठल्याही प्रकारची हयगय चालणार नाही. टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी सूक्ष्म नियोजन करा व येत्या तीन ते चार महिन्यात ते प्रत्यक्षात उतरवा. टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी सध्या १६५ मेगावॅट वीज लागते. ही योजना राज्यातील पहिली सौरऊर्जाचलित उपसा सिंचन योजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री फडणवीेस यांनीे घनकचरा विलगीकरण व व्यवस्थापन तसेच सांडपाणी व्यवस्थापन यावर भर द्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. पोलिस विभागाने डॉल्बीमुक्त गणेशोत्सव संकल्पनेतून जलयुक्त शिवार योजनेला केलेल्या मदतीच्या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले.
यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासह अधिकारी पदाधिकारी, कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता अभियानाचे कौतुक
स्वच्छ भारत अभियानामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये चांगले काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात जवळपास ७० हजार शौचालयांपेक्षा अधिक शौचालये बांधणीचे काम झाले आहे. हा एक प्रकारे विक्रमच आहे. स्वच्छतेमध्ये चांगले काम केलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकेने केवळ हागणदारीमुक्तीवरच न थांबता स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.