सांगलीत कृष्णा नदीत दोघे युवक बुडाले; गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जनावेळी दुर्घटना
By घनशाम नवाथे | Published: September 5, 2024 08:46 PM2024-09-05T20:46:51+5:302024-09-05T20:48:14+5:30
अंधारानंतर शोध मोहिम थांबवली.
घनशाम नवाथे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : येथील शिवाजी मंडईजवळील वाल्मिक मित्र मंडळाची गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जन करताना आदित्य अजय रजपूत (वय १६), अक्षय मनोज बनसे (वय १८) हे दोघे युवक सांगलीत सरकारी घाटाजवळ बुडाले. गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. दोघेजण भोवऱ्यात अडकून बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या घटनेनंतर रेस्क्यू टीम आणि महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंधारानंतर शोध मोहिम थांबवली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवाजी मंडईसमोरील वाल्मिक मित्र मंडळातर्फे प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाची गणेशमूर्ती वर्षभर ठेवली जाते. त्यानंतर विसर्जन करून नवीन मूर्ती आणली जाते. गतवर्षाची गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन विसर्जन करण्यासाठी सरकारी घाटावर सायंकाळी पाच वाजता आले होते. तेव्हा जवळपास चार फुटाची मूर्ती घेऊन सहाजण नदीपात्रात उतरले. धरणातून पाणी साेडल्यामुळे पातळी वाढली असून पाण्याला धार होती.
मूर्ती पात्रात काही अंतरावर सोडून कार्यकर्ते बाहेर पडताना तिघेजण पाण्यात बुडू लागले. तेव्हा एका मच्छिमाराने धाडसाने उडी घेऊन बुडणाऱ्या राज चव्हाण याला बाहेर काढले. तोपर्यंत आदित्य आणि अक्षय भोवऱ्यात अडकले. दोघांना पात्राबाहेर येता आले नाही. दोघेजण जागीच भोवऱ्यात अडकून बुडाले. काठावर असलेल्या तरूणांनी मदतीसाठी आरडाओरड केला. परंतू क्षणार्धात दोघे पाण्यात बुडून दिसेनासे झाले.
दोघे युवक बुडाल्याचे समजताच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन, विश्वसेवा बोट क्लब यांनी नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू काही वेळातच अंधार पडला. तसेच पाण्याला धार असल्यामुळे शोध कार्यात अडथळे येत होते. शहर पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली. शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांनीही घटनास्थळी येऊन माहिती घेतली.
दोघेही गरीब कुटुंबातील
आदित्य व अक्षय नदीत बुडाल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. दोघे गरीब कुटुंबातील आहेत. आदित्य हा कॉलेजला जातो. आई आणि भाऊ, बहिण असे तिघेजण आहेत. तर अक्षय देखील खासगी नोकरी करतो. त्यालाही वडील नसून आई-बहिणीसह तो राहत होता.
घाटावर अंधाराचे साम्राज्य
गतवर्षीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सरकारी घाटावर मंडळाचे कार्यकर्ते येत आहेत. परंतू घाटावरील पथदिवे बंद असून सर्वत्र अंधार आहे. अंधारामुळे शोध मोहिम खंडीत करावी लागली.