Sangli: दुचाकी-कारची समोरासमोर धडक, अपघातात बेणापूरचे दोघे तरूण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 04:15 PM2023-11-21T16:15:57+5:302023-11-21T16:16:47+5:30
एकजण गंभीर जखमी
पांडुरंग डोंगरे
खानापूर : गुहागर - विजापुर राष्ट्रीय महामार्गावर खानापूर येथे दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बेणापूर (ता. खानापूर) येथील दोन तरुण जागीच ठार झाले. हा अपघात काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास खानापूर जवळ भिवघाट रोडवर घडला. रुपेश शेखर गायकवाड (वय २८) व सुमित प्रविण धेंडे (१४, दोघे रा. बेणापूर ता. खानापूर जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. तर अश्वजित दाजी धेंडे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचुर झाला.
बेणापूर येथील रुपेश गायकवाड हा दोन मित्रांसह खानापूरकडून बेणापूरकडे दुचाकीवरून (एम. एच. १०-डी.आर-७२४१) निघाला होता. यावेळी भिवघाटकडून खानापूरकडे येणारी भरधाव मोटार (क्र. एपी-०७-सीएम-५६६५ ) व रुपेश गायकवाड याच्या दुचाकीची धन निरंकार सत्संग भवनजवळ समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील रुपेश गायकवाड व सुमित धेंडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अश्वजित धेंडे हा गंभीर जखमी झाला.
जखमी अश्वजित याच्यावर भिवघाटच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करंजे ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
मयत रूपेश गायकवाड हा विवाहित आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली आहेत. तर मयत सुमित धेंडे इयत्ता नववीमध्ये शिकत होता. या अपघाताची बातमी खानापूर घाटमाथ्यावर आज, मंगळवारी सकाळी पसरली. दोन तरुणांचा अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.