सांगलीतील दोन तरुण कृष्णा नदीपात्रात बेपत्ता, गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जनावेळी घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:36 AM2024-09-06T11:36:10+5:302024-09-06T11:36:28+5:30
सांगली : येथील वाल्मीक मित्र मंडळाची गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जन करताना आदित्य अजय रजपूत (वय १६), अक्षय मनोज बनसे (वय ...
सांगली : येथील वाल्मीक मित्र मंडळाची गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जन करताना आदित्य अजय रजपूत (वय १६), अक्षय मनोज बनसे (वय १८) हे दोघे युवक सरकारी घाटाजवळ बुडाले. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. दोघे जण भोवऱ्यात अडकून बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या घटनेनंतर रेस्क्यू टीम आणि महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंधारानंतर शोध मोहीम थांबवली.
शिवाजी मंडईसमोरील वाल्मीक मित्र मंडळातर्फे प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाची गणेशमूर्ती वर्षभर ठेवली जाते. त्यानंतर विसर्जन करून नवीन मूर्ती आणली जाते. गतवर्षाची गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन विसर्जन करण्यासाठी सरकारी घाटावर सायंकाळी ५ वाजता आले होते. धरणातून पाणी साेडल्यामुळे पातळी वाढली असून, पाण्याला धार होती.
मूर्ती पात्रात काही अंतरावर सोडून कार्यकर्ते बाहेर पडताना तिघे जण पाण्यात बुडू लागले. तेव्हा एका मच्छीमाराने धाडसाने उडी घेऊन बुडणाऱ्या राज चव्हाण याला बाहेर काढले. तोपर्यंत आदित्य आणि अक्षय भोवऱ्यात अडकले. दोघांना पात्राबाहेर येता आले नाही. दोघे जण जागीच भोवऱ्यात अडकून बुडाले.