सांगलीतील प्रकार : ऊस वाहतूक करणाऱ्या बैलाला मरणयातना, कसरतीनंतर वीस मिनिटे वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 07:45 PM2018-01-10T19:45:17+5:302018-01-10T19:55:50+5:30
वेळ सायंकाळी पाचची... वसंतदादा कारखान्याजवळील संपत चौकात एका बैलगाडीभोवती गर्दी जमलेली... नुकत्याच केलेल्या गतिरोधकावरील ग्रीडच्या (खडी) ढिगाऱ्यांवरून ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीच्या बैलांचे पाय घसरत होते. अर्धा तास सुरू असलेल्या कसरतीनंतर वेदनांनी त्रस्त झालेल्या बैलांच्या डोळ्यांतून पाणी आले... पायाजवळ मातीचे ढीग तयार करून अखेर या बैलगाडीला मार्गस्थ करण्यात आले.
सांगली : वेळ सायंकाळी पाचची... वसंतदादा कारखान्याजवळील संपत चौकात एका बैलगाडीभोवती गर्दी जमलेली... नुकत्याच केलेल्या गतिरोधकावरील ग्रीडच्या (खडी) ढिगाऱ्यांवरून ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीच्या बैलांचे पाय घसरत होते. अर्धा तास सुरू असलेल्या कसरतीनंतर वेदनांनी त्रस्त झालेल्या बैलांच्या डोळ्यांतून पाणी आले... पायाजवळ मातीचे ढीग तयार करून अखेर या बैलगाडीला मार्गस्थ करण्यात आले.
सांगलीच्या अनेक रस्त्यांवर सध्या दगडी ग्रीड पसरली आहे. किरकोळ व गंभीर अपघात घडवित या ग्रीडने रक्ताचा खेळ सध्या चालविला आहे. माणसाला त्रासदायक ठरणाऱ्या या ग्रीडने आता मुक्या जनावरांनाही छळण्यास सुरुवात केली आहे. वसंतदादा कारखान्याकडे ऊस वाहतूक घेऊन जाणारी एक बैलगाडी गतिरोधकाजवळ अडकली.
एक तर प्रमाणापेक्षा जास्त भरलेली उसाची गाडी आणि त्यात रस्त्यावरील ग्रीडमुळे बैलाला मरणयातना सोसाव्या लागल्या. बैलाचे पाय घसरून तो वाकण्याच्या स्थितीत आल्याने संपत चौकातील काही नागरिकांनी हे वाहन तिथेच थांबविले. बैलाला थोडी विश्रांती घेण्यास वेळ दिला. पाच ते सहा नागरिकांनी परिसरातील माती हाताने उचलून बैलाच्या पायाखाली टाकली. कित्येक किलोमीटरचा प्रवास करून थकलेल्या बैलांच्या डोळ्यात तोपर्यंत अश्रू वाहू लागले.
हे दृश्य पाहून अनेकांचे मन हेलावत होते. दररोज या मार्गावरून अशा अनेक बैलगाड्या जात असतात. कधीही असा प्रसंग निर्माण झाला नव्हता. मात्र दोनच दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेल्या गतिरोधकाने बैलांचा छळ मांडला आहे.
पेव्हिंग ब्लॉकचे हे गतिरोधक बसवून त्याच्याभोवती डांबर आणि ग्रीड ओतण्यात आली आहे. त्यामुळे हा गतिरोधक सोयीपेक्षा अधिक धोकादायकच बनला आहे. वाहनेही घसरत आहेत. त्यामुळे बैलांचा दररोजचा कारखान्याकडील प्रवासही खडतर बनला आहे. एक, दोन नव्हे, तर अशाप्रकारचे चार-चार गतिरोधक या मार्गावर केले आहेत. त्यामुळे या बैलगाडीला जुंपलेल्या बैलांचे हाल माणसांपेक्षाही वाईट झाले आहेत.
वाहने थांबली...
बैलगाडी अडकल्यामुळे सुमारे २0 मिनिटे वाहतुकीची कोंडी झाली होती. तरीही बैलांचे हाल पाहून वाहनधारकांनीही संयम बाळगल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले.