उंडाळकरांचे सोयीचे राजकारण पचनी पडेना!
By Admin | Published: April 10, 2017 09:35 PM2017-04-10T21:35:35+5:302017-04-10T21:35:35+5:30
जाधवांपाठोपाठ चव्हाणही सटकले : बाजार समितीचा नवा कारभारी कोण? अनेक इच्छुकांनी बांधले बाशिंग
प्रमोद सुकरे ---कऱ्हाड --दक्षिणचं राजकारण सुलभ करण्यासाठी उत्तरेतील उपद्रवमूल्य वेळोवेळी दाखवून द्यायचे, हा तर उंडाळकरांचा जुनाच ‘खेळ’. म्हणून तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रेठऱ्याच्या डॉक्टरांनाच प्रिस्क्रीप्शन देत ‘एकला चलो’चा नारा दिला. आणि पंचायत समितीच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीबरोबर ‘मेळ’ घातला. यावेळी त्यांनी एकाचवेळी पारंपरिक विरोधक ‘पृथ्वीबाबा’, भविष्यातील विरोधक ‘अतुलबाबा’ आणि घरातील विरोधक ‘राजाभाऊ’ यांना जणू तास, मिनिट आणि सेकंद काट्याने घायाळ केले. यामुळे उंडाळकरांचे काही समर्थक समाधानी दिसत असले तरी अनेकांना हा मेळ पचनी पडलेला दिसत नाही.
म्हणून तर गोळेश्वरच्या जाधवांपाठोपाठ कोपर्डेचे चव्हाणही त्यांच्या तंबूतून सटकल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात स्थित्यंतरे काही नवीन नाहीत. प्रत्येक निवडणुकीला इथे नवी समीकरणे ‘उदया’ला येत असल्याने कार्यकर्त्यांची गोची पाहायला मिळते; पण सत्तेच्या सारीपाटावर विराजमान होण्यासाठी गळ्यात गळे घालणाऱ्या नेत्यांना याचे सोयरसुतक नसल्याचे दिसते. उंडाळकर-भोसलेंचे मैत्रिपर्व संपल्याचे संकेत मिळताच बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव जाधव यांनी भोसलेंची साथ धरली. तर पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर काही दिवसांतच बाजार समितीचे विद्यमान सभापती हिंदुराव चव्हाणांनीही उंडाळकरांना रामराम ठोकल्याने तालुक्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांची तालुक्याच्या राजकारणावर मोठी पकड होती. पण आठ वर्षांपूर्वी त्याला नाट लागला. तालुक्याच्या राजकारणात उंडाळकर विरोधी नेत्यांची महाआघाडी आकारली. आणि बाजार समितीच्या निवडणुकीत ऐतिहासिक सत्तांतर झाले. तेव्हापासून पराभवाची मालिका विधानसभेपर्यंत सुरूच होती.
विधानसभा निवडणुकीनंतर पृथ्वीबाबांच्या विरोधात पराभवाची चव चाखलेल्या उंडाळकर-पाटील व रेठरेकर-भोसले यांच्या मैत्रिपर्वाला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या कृष्णेच्या निवडणुकीत मोहिते विरोधात तिरंगी लढतीत डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने बाजी मारली. तर बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तांतर होऊन भोसलेंच्या मदतीने उंडाळकर सत्तेत घुसले. या मैत्रिपर्वाची नाव मजल दरमजल करीत आता पैलतीर गाठेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा वाटत असतानाच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरच दोन्हीकडील कार्यकर्त्यांची पंचाईत झाली. भोसलेंनी भाजपचे कमळ हातात धरले तर उंडाळकरांनी स्वतंत्रपणे आघाडीचा नारळ फोडला.
या निवडणुकीत उंडाळकर गटाला पंचायत समितीच्या सात जागा मिळाल्या. तर भाजपच्या भोसलेंनीही विजयाचा ‘सिक्सर’ मारला. पृथ्वीबाबांच्या ‘हाता’ला मात्र फारसे यश मिळाले नाही. राष्ट्रवादीच्या यशाचा काटाही सातपर्यंत जाऊन पोहोचला. अशा त्रिशंकू परिस्थितीत राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, याची प्रचिती तर येणार होतीच. त्यामुळे उंडाळकर-रेठरेकर पुन्हा मैत्रिपर्वाच्या नौकेत बसतील, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, काकांनी राष्ट्रवादीच्या घड्याळात बघत अचूक ‘टायमिंग’ साधले.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सोपी जावी म्हणूनच बाजार समितीचे सभापती असणाऱ्या गोळेश्वरच्या पैलवान शिवाजीराव जाधव यांच्यामागे राजीनाम्याची भुणभुण लावल्याची चर्चा आहे. या पैलवानांनीही रडीचा डाव न खेळता थेट राजीनामा देऊन टाकला. आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उंडाळकरांच्या व्यासपीठाऐवजी रेठरेकर भोसलेंच्या व्यासपीठावर चढणे पसंत केले. त्याचे बक्षीस म्हणूनच त्यांना नुकतेच कृष्णेचे स्वीकृत संचालकपद बहाल केल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे उत्तरेवरील स्वारीचा मार्ग सुकर करण्यासाठी कोपर्डेच्या हिंदुराव चव्हाणांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ घालण्यात आली; पण पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने चव्हाणांच्या पुतण्यालाच उमेदवारी देत भाऊसाहेबांची कोंडी केली. साहजिकच प्रचारादरम्यान भाऊसाहेब चव्हाण विश्रांती घेत असल्याचे दिसले. त्यातच उंडाळकरांच्या हाताला उत्तरेवरील स्वारीत काहीच लागले नसल्याने ज्येष्ठ नेते नाराज झाले होते.
पंचायत समितीत राष्ट्रवादी आणि उंडाळकरांची आघाडी अशी सत्ता स्थापन झाली तरी उंडाळकरांच्या आघाडीतील उत्तरचे शिलेदार यादरम्यान कुठेच दिसेनासे झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हिंदुराव चव्हाण यांच्या राजीनाम्याकडे बघितले जाते. आता समितीचा नवा कारभारी कोण याची चर्चा सुरू आहे.
एक पद रिक्त : सत्ताधाऱ्यांची संख्या चौदावर.!
बाजार समितीची एकूण १९ संचालक पदे आहेत. त्यापैकी प्रक्रिया गटातील संचालक पद रिक्तच आहे. १८ संचालकांपैकी दोन संचालक हे उंडाळकर-भोसले विरोधी पॅनेलमधून निवडून आले आहेत. तर शिवाजीराव जाधव यांच्यापाठोपाठ हिंदुराव चव्हाणही सटकल्याने सत्ताधाऱ्यांची संख्या चौदावर येऊन ठेपली आहे. त्यात भोसले गटाचेही संचालक आहेत म्हणे.
बाजार समितीच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर, डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील निवडणुकीतून मी संचालक म्हणून निवडून आलो. सध्या उंडाळकर आणि भोसले यांच्यात अंतर पडले आहे. उंडाळकरांना फक्त सध्या मुलाच्या राजकीय भवितव्याची काळजी लागली आहे. अशा पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या दिशाहीन नेतृत्वाखाली काम करणे योग्य वाटत नाही. म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
- हिंदुराव चव्हाण, माजी सभापती, बाजार समिती, कऱ्हाड