छत्रपती घराण्याच्या जमीन विक्रीस उदयनराजेंना तूर्त मनाई
By Admin | Published: May 31, 2017 11:12 PM2017-05-31T23:12:14+5:302017-05-31T23:12:14+5:30
छत्रपती घराण्याच्या जमीन विक्रीस उदयनराजेंना तूर्त मनाई
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनामवर्ग १ सत्ताप्रकारच्या सर्व जमिनी आणि देवस्थान इनाम हक्काच्या सर्व जमिनी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येणार नाहीत. तसेच विजयसिंहराजे भोसले यांनी दाखल केलेल्या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत घराण्याच्या सर्वप्रकारच्या जमिनी विक्री करु नयेत. तसेच त्यावर इतर कोणाचा हक्क निर्माण करु नये, अशी तूर्त मनाई दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती के. एफ. एम. खान यांनी नुकतीच केली आहे, अशी माहिती विजयसिंंहराजे भोसले यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे की, विजयसिंंहराजे भोसले यांनी सातारा दिवाणी न्यायालयात उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांच्या विरोधात २००३ मध्ये दावा दाखल केला होता. सदर दाव्यात महाबळेश्वर, लिंंब, बावधन, बोंडारवाडी, कोडोली, गोडोली, आरफळ यासह छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनाम वर्ग १ सत्ताप्रकारच्या सर्व जमिनी आणि प्रतापगड, शिंगणापूर यासह सर्व देवस्थान इनाम हक्काच्या सर्व जमिनी छत्रपती घराण्याच्या सामाईक मालकीच्या आहेत, असे जाहीर होऊन मिळावे. सदर जमिनी अहस्तांतरणीय, अविभाजीय आहेत, असे जाहीर होवून मिळावे. सदर मिळकती सातारा छत्रपती घराण्याच्या सरंजाम इनाम सत्ताप्रकार व देवस्थान इनाम सत्ताप्रकाराच्या सर्व जमिनी उदयनराजे, कल्पनाराजे यांनी महाराष्ट्र शासन व वादी विजयसिंंहराजे व त्यांचे बंधू अभयसिंंहराजे भोसले,शिवाजीराजे भोसले यांच्या संमतीशिवाय कोणासही विक्री अथवा अन्यप्रकारे तबदील करु नयेत. स्वत: अथवा कुळ, एजंट अगर मुखत्यार मार्फत करु नयेत, अशी निरंतर ताकीद मागणी करण्यासाठी दावा दाखल केला होता.
तसेच, या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत उदयनराजे व कल्पनाराजे यांनी स्वत: अगर इतरांमार्फत सातारा छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनाम वर्ग १ व देवस्थान इनाम सत्ताप्रकारच्या कोणत्याही मिळकती अन्य कोणालाही गहाण, दान, लीज, लीन, बक्षिस, खरेदी- विक्री अगर अन्यप्रकारे हस्तांतर करु नयेत व त्याच्या नोंदी महसूल रेकॉर्डला करु नयेत, अशी तुतातूर्त ताकीद देण्यासाठी वादी यांनी अर्जही केला होता. सदर अर्जाची सुनावणी होऊन न्यायाधीश श्रीमती खान यांनी हा निर्णय दिला आहे.
वादी विजयसिंंहराजे भोसले यांची दाव्याच्या दरम्यानची तुर्तातूर्त ताकीदीची मागणी मंजूर करुन सातारा छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनाम व देवस्थान इनाम सत्ताप्रकारच्या सर्व जमिनीमध्ये विजयसिंहराजे भोसले व त्यांचे बंधू दिवंगत अभयसिंंहराजे भोसले व शिवाजीराजे भोसले यांना हक्क आहे.
सर्व मिळकती शासनाने फॅमिली ग्रँड म्हणून दिल्या आहेत. सदरच्या मिळकती शासनाच्या पुर्व परवानगीशिवाय विक्री करता येत नाहीत, असे स्पष्टपणे धरुन प्रतिवादी उदयनराजे व कल्पनाराजे यांना सदर जमिनी शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येणार
नाहीत.
म्हणून दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत सदर जमिनींची विक्री अथवा जमिनीवर इतर कोणाचाही हक्क निर्माण करु नये, अशी तुर्तातूर्त ताकीद संबंधित न्यायालयाने दिली आहे.
जुने व्यवहारही रद्द करण्याची मागणी
महाबळेश्वर व इतर परिसरात खासदार उदयनराजे यांच्यासोबत जमिनीसंदर्भात पूर्वी अनेकांचे व्यवहार झाले आहेत. वादी यांनी यापूर्वी जमीन विक्रीचे झालेले व्यवहारही रद्द करुन मागितले आहेत, असेही विजयसिंंहराजे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.