उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: April 12, 2017 12:18 AM2017-04-12T00:18:26+5:302017-04-12T00:18:26+5:30
सोना अलाईज खंडणी प्रकरण; हत्येच्या प्रयत्नाचा अन् खंडणीचा आरोप
सातारा : ‘खंडणी व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. दरम्यान, या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहे,’ अशी माहिती अॅड. दत्ता बनकर यांनी दिली.
लोणंद येथे सोना अलाईज या नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक राजीव जैन यांना १८ फेब्रुवारीला खासदार उदयनराजे भोसले यांनी येथील सर्किट हाऊसवर बैठकीसाठी बोलाविले होते. ‘कंपनीतील कामगारांचे काय झाले?,’ असे विचारून उदयनराजे यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर उदयनराजे यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप जैन यांनी केला होता. शहर पोलिस ठाण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १५ जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी नऊजणांना अटक केली आहे, तर तीनजण अद्याप फरार आहेत.
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी या घटनेनंतर न्यायालयात तत्काळ अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. मंगळवारी सरकारी पक्षाच्या वतीने नितीन मुके आणि महेश कुलकर्णी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत असल्याचा आदेश दिला. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य !
खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे. सकृतदर्शनी फिर्यादीला मारहाण केल्याचा पोलिसांकडे पुरावा आहे. मात्र, तपास अर्धवट असून, अद्याप पूर्ण व्हायचा आहे.
तसेच खंडणी स्वरूपात २४ लाख घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या कथित रकमेची रिकव्हरीही व्हायची आहे. तसेच जादा तपास आणि अद्याप काही आरोपींना अटक करायची आहे.
सर्किट हाऊसवर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही फिर्यादी आणि संशयित येताना आणि जाताना दिसत आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाने आपल्या युक्तिवादामध्ये केली.