मिरजेत उद्धवसेनेकडून तानाजी सातपुते यांना उमेदवारी; शिराळा, जतला भाजपमध्ये तर सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 04:31 PM2024-10-28T16:31:48+5:302024-10-28T16:32:38+5:30
सांगली : महाविकास आघाडीअंतर्गत मिरजेच्या जागावाटपाचा संभ्रम रविवारी दूर झाला. याठिकाणी उद्धवसेनेने तानाजी सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी ...
सांगली : महाविकास आघाडीअंतर्गतमिरजेच्या जागावाटपाचा संभ्रम रविवारी दूर झाला. याठिकाणी उद्धवसेनेने तानाजी सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष व काँग्रेसमधील इच्छुकांच्या पदरी निराशा आली. तसेच, उमेदवारीवरून शिराळा व जतमध्ये भाजपची आणि सांगलीत काँग्रेसमधील इच्छुकांनी बंड पुकारले आहे.
मिरजेच्या जागेसाठी आघाडीतील तिन्ही पक्षांत संघर्ष होता. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष व उद्धवसेनेमध्ये रस्सीखेच सुुरू होती. अखेर ही जागा उद्धवसेनेला देण्यात आली. मागील निवडणुकीत ही जागा आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला गेली होती. आता ती महाविकास आघाडीतील उद्धवसेनेला गेली आहे. त्यामुळे उद्धवसेनेच्या पदरात जिल्ह्यातील एकमेव जागा पडली आहे.
खानापूर मतदारसंघासाठीही राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष व उद्धवसेनेमध्ये रस्सीखेच सुुरू आहे. भाजपचे मंत्री सुरेश खाडे विरुद्ध उद्धवसेनेचे तानाजी सातपुते अशी ही लढत होणार आहे. बंडखोरी होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.
सांगलीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये, तसेच जत व शिराळा मतदारसंघात भाजपमध्ये गटबाजी उफाळली आहे. पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी मान्य नसल्याने काँग्रेसमधील इच्छुक जयश्री पाटील, शिराळ्यातील भाजपचे इच्छुक सम्राट महाडिक व जतमध्ये तम्मनगौडा रवी-पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.
सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी
सांगलीत रविवारी जयश्रीताई पाटील यांनी त्यांच्या गटाची बैठक घेत बंडखोरी जाहीर केली. सोमवारी, २८ ऑक्टोबरला त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसची या मतदारसंघातील डोकेदुखी वाढणार आहे.
शिराळ्यात भाजपमध्ये फूट
शिराळा मतदारसंघात भाजपने सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या महाडिक गटाने बैठक व मेळावा घेत बंडखोरीचे निशाण फडकाविले. त्यामुळे भाजपमध्ये आता दोन गट पडले आहेत.
जतमध्ये भाजपच्या नाराजांची स्थानिक आघाडी..
जतमध्ये गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनी बंड पुकारले आहे. स्थानिक आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला. त्यानुसार स्थानिक आघाडीच्या वतीने तम्मनगौडा रवी-पाटील अर्ज दाखल करणार आहे.