लोकसभेसाठी राजू शेट्टींना ‘मातोश्री’चे पाठबळ मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 05:42 PM2023-04-03T17:42:06+5:302023-04-03T17:42:34+5:30

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या महाआघाडीकडे याठिकाणी उमेदवार नसल्याचे चित्र

Uddhav Thackeray group of Shiv Sena will help Raju Shetty for Lok Sabha | लोकसभेसाठी राजू शेट्टींना ‘मातोश्री’चे पाठबळ मिळणार?

लोकसभेसाठी राजू शेट्टींना ‘मातोश्री’चे पाठबळ मिळणार?

googlenewsNext

अशोक पाटील

इस्लामपूर :  राजू शेट्टी यांनी एकला चलोची भूमिका घेतली आहे. परंतु, शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील तत्कालीन शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर यांच्याबरोबर असलेली शेट्टी यांची जवळीक पाहता आगामी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टी यांच्या भूमिकेला मातोश्रीवरून आशीर्वाद मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे, तर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना भाजप-शिवसेना युतीकडून उमेदवारी मिळणार असे ठामपणे त्यांचे समर्थक सांगताहेत. पुन्हा एकदा माने आणि शेट्टी यांच्यात दुरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या महाआघाडीकडे याठिकाणी उमेदवार नसल्याचे चित्र आहे. शेट्टी यांची भूमिका महत्त्वाची आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीशी केलेली सोयरीक स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महागात पडली होती, तर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कोट्यातून शेट्टी यांना विधान परिषदेवर घेण्याचा डाव भाजपने हाणून पाडला होता. याचाही राग शेट्टी यांच्या मनात आहे.

भाजप व राष्ट्रवादीला लांब ठेवूनच लोकसभा लढवण्याचा निर्धार शेट्टींनी केला असला तरी एकला चलोच्या भूमिकेला एखाद्या गटाची ताकद घ्यावीच लागणार, अशी चर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आहे.

नेते एकत्र आले तर...

उद्धव ठाकरे समर्थक शिरोळ मतदारसंघातील माजी आमदार उल्हास पाटील, हातकणंगले मतदारसंघातील माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि राजू शेट्टी नेहमीच एकत्रित व्यासपीठावर दिसतात. शेट्टी यांच्या दूध संघात उल्हास पाटील संचालक आहेत. शिरोळ तालुक्यातील विकास आघाडीचे नेतृत्व शेट्टी व उल्हास पाटील यांच्याकडे आहे.
 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेप्रणीत आमच्याच पक्षाचा उमेदवार असेल. गत निवडणुकीत धैर्यशील माने यांच्या पाठीशी आम्ही होतो. माने यांची भूमिका बदलली आहे.  मातोश्रीवरून आदेश येईल तो शिरसावंद्य मानू. - अभिजित पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

आजही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका ‘एकला चलो’ची आहे. हातकणंगले व इतर लोकसभा मतदारसंघात आमच्या संघटनेला पाठिंंबा मिळत आहे. आगामी काळात समीकरणे काय असतील हे सांगता येत नाही. योग्य वेळी भूमिका स्पष्ट होईल. - भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Uddhav Thackeray group of Shiv Sena will help Raju Shetty for Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.