ऊसदराची कोंडी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:24 AM2017-11-06T00:24:11+5:302017-11-06T00:26:23+5:30

Uissarachi Kondi Shuttle | ऊसदराची कोंडी फुटली

ऊसदराची कोंडी फुटली

googlenewsNext


सांगली : कोल्हापूरप्रमाणेच सांगलीतही एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊस दराचा तोडगा, रविवारी सायंकाळी जिल्हा बँकेत पार पडलेल्या बैठकीत निघाला. सरासरी १२.५ टक्के उसाचा उतारा गृहीत धरला, तर जिल्ह्यातील कारखान्यांकडून २९00 ते ३२00 रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी ऊसदराच्या प्रश्नावर शिष्टाई केली. बँकेत पार पडलेल्या या बैठकीस शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, प्रवक्ते महेश खराडे, संजय बेले, सयाजी मोरे, महावीर पाटील, जयकुमार कोले, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील ऊसदराबाबत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कारखानदारांची तयारी असेल, तर आम्ही ती मान्य करू, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, सोनहिरा कारखान्याचे मोहनराव कदम, क्रांती कारखान्याचे अरुण लाड, हुतात्मा कारखान्याचे वैभव नायकवडी, विश्वास कारखान्याचे मानसिंगराव नाईक आणि महांकाली कारखान्याचे गणपती सगरे या सर्व नेत्यांनी यासंदर्भात चर्चा करण्याचे अधिकार रविवारी दुपारी दिलीपतात्यांना दिले.
पाटील यांनी शेट्टी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला आणि सायंकाळी बैठक निश्चित झाली. बैठकीत झालेल्या चर्चेविषयी पाटील म्हणाले की, सुरुवातीला एफआरपी अधिक शंभर रुपये आणि उरलेले शंभर रुपये दोन महिन्यांनी देण्याचे निश्चित झाले आहे. हा तोडगा सर्वमान्य झाल्याने दराची कोंडी खºयाअर्थाने फुटली आहे.
शेट्टी म्हणाले की, सभासद आणि कारखानदारांची भूमिका या दर निश्चितीच्या प्रक्रियेत महत्त्वाची आहे. सर्वमान्य तोडगा निघाल्यामुळे आम्ही आंदोलन थांबविले आहे. गेल्यावर्षी एफआरपी अधिक १७५ असा तोडगा निघाला होता. कृषी मूल्य आयोगाने यंदाचा एफआरपी निश्चित करतानाच २३00 वरून २५५0 असा वाढविला आहे. त्यामुळे गतवर्षाशी तुलना करता, शेतकºयांना एकूण वाढ ३५३ रुपयांची मिळाली आहे. जिल्ह्णातील कारखान्यांचा सरासरी उतारा १२.५ टक्के गृहित धरला, तर साधारण २८00 ते ३२00 रुपयांपर्यंत दर मिळणार आहे. कर्नाटकातील कारखान्यांबाबत ते म्हणाले की, येथील शेतकºयांच्या स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. त्यांना कुठेही ऊस घालण्याची मुभा आहे. जिल्ह्णातील कारखान्यांना जर आपल्या भागातील ऊस कर्नाटकात जाऊ नये असे वाटत असेल, तर त्यांनी दराच्या स्पर्धात्मक पातळीवर प्रयत्न करावेत.
----
जिल्हा बँकांचे अस्तित्व राहावे
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा बँका सक्षम झाल्या पाहिजेत. त्या टिकल्या पाहिजेत. सरकारमार्फत यासाठी प्रयत्न होत नाहीत. ज्या बँका बंद आहेत, त्यांचे विलीनीकरण करण्यास हरकत नाही, मात्र आधीच तोट्यात असलेल्या राज्य सहकारी बँकेत त्याचे विलीनीकरण करून काहीही साध्य होणार नाही, असे शेट्टी म्हणाले.
सक्षम कारखान्याप्रमाणे
दत्त इंडिया दर देणार!
जिल्ह्यातील हुतात्मा, राजारामबापू, क्रांती व अन्य सक्षम कारखान्यांप्रमाणे रिकव्हरी गृहीत धरून वसंतदादा कारखानाही दर देईल. वसंतदादा कारखान्याची एफआरपी कमी असली तरी, आम्ही सक्षम कारखान्यांप्रमाणे दर देण्याला प्राधान्य देणार आहोत, असे दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू यांनी सांगितले.

साखरेच्या दरावर लक्ष
साखरेचे दर सध्या ३४00 रुपये क्विंटलवर स्थिर आहेत. साखरेचे भाव वाढले, तर निश्चितपणे मागील वर्षाप्रमाणे आम्ही दर वाढवून मागवू. येत्या मार्च महिन्यात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. साखरेच्या दरावर आमचे लक्ष राहील, असे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

सदाभाऊंचा आवाज ऐकला नाही : शेट्टी
सदाभाऊ खोत यांच्याविषयी शेट्टी म्हणाले, बरेच दिवस त्यांचा आवाज मी ऐकला नाही. ऊस दराचा तोडगा निघताना आज तरी आवाज येईल, असे वाटले पण तो आला नाही.
कोल्हापुरात एफआरपी अधिक दोनशे रुपयांवर तोडगा
कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने रविवारी झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत अखेर ऊसदराची कोंडी फुटली. ‘एफआरपी अधिक २०० रुपये’ असा तोडगा निघाला आहे. -वृत्त/७

Web Title: Uissarachi Kondi Shuttle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती