Sangli- उमदी आश्रमशाळा विषबाधा प्रकरण: दोन मुख्याध्यापकांसह चौघे निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:16 PM2023-08-31T14:16:32+5:302023-08-31T14:17:12+5:30
सहायक आयुक्तांची कारवाई : गुन्हाही दाखल होणार
सांगली : उमदी (ता. जत) येथील आश्रमशाळेतील १५४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याप्रकरणी दोन मुख्याध्यापक, दोन अधीक्षकांवर समाजकल्याणचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी गुरुवारी निलंबनाची कारवाई केली. तसेच या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय ४१, माडग्याळ ग्रामीण रुग्णालय २० आणि आश्रमशाळेत १० विद्यार्थी असे १५४ विद्यार्थ्यांवर उपचार केले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची तब्यत चांगली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिळे अन्न देऊन त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका आश्रमशाळेचे कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र महादेव होर्ती, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बगली, मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक विकास तुकाराम पवार, मुलींच्या वसतिगृहाच्या महिला अधीक्षक अक्कमहादेवी निवर्गी यांच्यावर चौकशी समितीने ठेवला आहे.
याप्रकरणी या चौघांवर सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच मुलांना शिळे अन्न दिल्याप्रकरणी चौघांवरही गुन्हा दाखल करणार आहे, असेही चाचरकर म्हणाले. आश्रमशाळा चालविताना व्यवस्थापनाने गंभीर चूक केल्याप्रकरणी आपली मान्यता रद्द का करू नये, अशी नोटीसही व्यवस्थापनाला दिली आहे.